भीषण अपघात!कार – दुचाकीच्या धडकेत आज्जी व नातवाचा मृत्यू
लोकगर्जनान्यूज
गेवराई : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आज्जी व नातवाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर गढी ( ता. गेवराई ) जवळ शुक्रवारी ( दि. २७ ) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. धडक देऊन कार रस्त्याच्या खाली जाऊन विद्युत रोहित्राला धडकली असून कारमधील तिघे गंभीर जखमी आहेत. धडक इतकी भीषण होती की, आज्जीचा जागीच मृत्यू झाला तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनं चक्काचूर झाली.
सुशीला आश्रुबा उबाळे ( वय ६५ वर्ष ) , संतोष धर्मराज उबाळे ( वय ३० वर्ष ) रा. भेंडटाकळी ( ता. गेवराई ) असे या अपघातातील मयत आज्जी व नातवाचे नाव आहे. संतोष उबाळे हा आपल्या दुचाकीवरून क्र. MH 23 AG 3096 आज्जी सह गेवराई येथून भेंडटाकळीकडे जात होता. दरम्यान तो कल्याण-विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावर गढी जवळ असताना समोरून माजलगाव कडून येत असलेल्या भरधाव कार MH 20 DJ 6518 दुचाकीला जोराची धडक दिली. जबर मार लागल्याने सुशीला उबाळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच उपस्थितांनी मदत करत जखमी चौघांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान संतोष उबाळे यांचा मृत्यू झाला.दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. मयत नात्याने आज्जी,नातू होते. दुचाकीला धडकून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत रोहित्रावर जाऊन आदळली यामुळे कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. त्यांची नावे समजू शकली नाहीत. एकाच वेळी आज्जी व नातवाचा अपघाती मृत्यू झाल्याने भेंडटाकळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघात इतका भीषण होता की, कार , दुचाकी चक्काचूर झाले तर दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला.