भावनांमध्ये वाहून न जाता स्वतः ला सावरुन प्रगती साधा – डॉ. विद्या पवार
किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिरास प्रतिसाद
आडस / प्रतिनिधी :
किशोर वयीन काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. या वयात भावनांना मुरड घालून स्वतः ची व कुटुंबाची प्रगती साधा असे आवाहन डॉ. विद्या पवार यांनी येथील मुलींसाठी आयोजित किशोरवयीन समस्या व उपाय मार्गदर्शन कार्यक्रमात बोलताना केले.
केज तालुक्यातील आडस येथील लोककल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,आडस व जिवनदीप कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( दि. १७ ) सकाळी मुलींसाठी किशोरवयीन समस्या व उपाय मार्गदर्शन, चर्चा सत्र पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून येथील डॉ. विद्या विशालसिंह पवार या उपस्थित होत्या. त्यांनी यावेळी किशोरवयीन मुलींना या वयातील शारीरिक, मानसिक ,सामाजिक बदल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळी या विषयाची भीती आणि समस्यांवर चर्चा करून उपाय सांगितले.या काळात स्वच्छतेचे महत्व सांगून स्वतःला कमी न लेखता ही महिलांसाठी नैसर्गिक देणगी असून तिचा आनंदाने स्वीकार करावा याविषयी प्रेरणा देण्यात आली. किशोरवयीन हा काळा प्रत्येकासाठी खूप महत्वाचा आहे. ही आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. तसेच या वयात मुलगा असो की, मुलगी खूप भावनिक होतात. यामध्ये वाहून न जाता स्वतः ला सावरून भवितव्य कसं घडवायचं याविषयी माहिती दिली. या काळातील मेहनत ही आयुष्याची शिदोरी असून यामुळे आपण यशस्वी होउ शकतो. आपलं व आपल्या कुटुंबाची प्रगती साधू शकतो असे म्हणाल्या. मुलींना शिक्षणासाठी अथवा इतर काही कारणासाठी घरा बाहेर पडावे लागते. यावेळी अनेकांशी संपर्क येतो त्यामुळे ‘बॅड टच गुड टच’ याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आशा कार्यकर्ती यांनी स्वच्छते बद्दल व मैत्री क्लिनीक या उपक्रमाबद्दल मुलींना माहिती दिली. मुलींना स्वतंत्रपणे या उपक्रमात सहभागी करून घेतल्यामुळे मुलीही बोलत्या झाल्या. यावेळी लोककल्याण संस्थेच्या सुषमा आकुसकर, कोचिंग क्लासेसच्या दिप्ती पवार, सामाजिक कार्यकर्त्या सविता आकुसकर, शिक्षक बालसिंग पवार, शिवरुद्र आकुसकर, आशा कार्यकर्तींची उपस्थिती होती. किशोरवयीन मुलीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.