भाऊबंदकी रक्ताळली! लहान भावाच्या हल्ल्यातील जखमी मोठ्या भावाचा मृत्यू
आरोपींना अटक करा म्हणत मृतदेह ताब्यात घेण्यास मुलींचा नकार
बीड : जमिनीच्या वादातून चौघांनी हल्ला केल्याने कुप्पा ( ता. वडवणी ) येथील संभाजी वडचकर गंभीर जखमी होते. त्यांच्यावर जवळपास महिनाभरापासून बीड येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताच्या मुलींनी चार जणांवर संशय व्यक्त करत त्यांना अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक झाली तरच मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा घेतला. आरोपींच्या अटकेसाठी एसपी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. यामुळे भाऊबंदकी रक्ताळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मयत संभाजी कारभारी वडचकर हे (दि. १३ ) डिसेंबर रोजी तेलगाव जवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांची स्कुटी क्र. एम.एच. १२ एस.डब्ल्यू. ४१८६ बाजुला पडलेली होती. त्यांच्या डोक्याला, चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. रुग्णवाहिकेतून त्यांना बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रिती वडचकर यांनी वडवणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेतातील विहिरीच्या हिस्स्याच्या कारणातून चौघांनी हल्ला केल्याचे म्हटले. त्यावरून दि. २७ डिसेंबर वडवणी पोलीस ठाण्यात आरोपी प्रकाश कारभारी वडचकर, आकाश प्रकाश वडचकर, वसंत बन्सी सावंत, महादेव बन्सी सावंत सर्व रा. कुप्पा ता.वडवणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दि. १३ डिसेंबर पासून मयत संभाजी कारभारी वडचकर यांच्यावर बीड येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान काल शुक्रवारी ( दि. १४ ) मृत्यू झाला. संतप्त मुली व नातेवाईकांनी हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जीवे मारायचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असतानाही पोलीसांनी आरोपींना अटक केली नाही. पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप करत मयताच्या मुलींना एसपी कार्यालयासमोर सकाळी ठिय्या मांडला होता.