भाई थावरे आडवे येताच पालकमंत्री गाडीतून उतरले
२५ % ॲग्रीम व सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम टाकण्याची केली मागणी
बीड : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री ना. अतुल सावे यांचा माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीने पालकमंत्र्यांचा ताफा आडवला. यावेळी भाई गंगाभिषण थावरेंना पहाताच गाडीतून बाहेर येऊन चर्चा केली.
मागील दहा दिवसांपासून बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला. जागीच सोयाबीन, कापसाची माती झाली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांची वर्षभराची सुगी गेल्याने दिवाळ निघालं आहे. परंतु शासन, प्रशासन झोपेत असून यावर कोणीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आठवडा होऊन गेला शेतकरी परतीच्या पावसामुळे हवालदिल झाले पण पालकमंत्री कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज शनिवारी ( दि. २२ ) पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी माजलगाव तालुक्यातील काही ठिकाणी भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांनी पालकमंत्र्यांचा ताफा आडवला. यावेळी भाई थावरे यांनी २५ % विमा ॲग्रीम देण्यात यावे तसेच परतीच्या पावसाने झालेल्या पिकांचे नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने मदत जाहीर करुन ती सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी केली.