भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवा-अॅड.राहुल वाईकर
बीड : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, तर त्यांना केंद्र सरकार आणि भाजपने पदावरून हटवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अॅड.राहुल वाईकर यांनी केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. ते महाराष्ट्रासह देशातील जनतेचे आदर्श होते, आहेत आणि राहतील, यात किंचितही शंका नाही. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. परंतु, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेहमीप्रमाणे वाचाळवीरपणा केला. महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केले असून त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी देखील अॅड.राहुल वाईकर यांनी केली. त्यांना केंद्र सरकार आणि भाजपने पदावरून हटवावे, अन्यथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींचा संतापाचा सामना करावा लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अॅड.राहुल वाईकर यांनी दिला आहे.