लोकगर्जनान्यूज
बीड : सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा लाईट (वीज) देण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाचा शासनालाच विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. दिवसा वीज हे केवळ ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा सलग वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी आणखी रात्रीचे जागणे सुरुच आहे.
शेतकऱ्यांची मत आणि समर्थन सर्वांनाच हवे असतात. पण त्यांच्या प्रश्नाशी ना सत्ताधाऱ्यांना ना विरोधकांना सोयरसुतक आहे. आजही शेतीसाठी थ्री फेज आठ तासच वीज मिळते, १६ तास भारनियमन आहे. यामुळे पाणी असूनही शेतकऱ्यांना विजे अभावी पिकांना पाणी देता येत नाही. योग्य प्रमाणात अन् योग्य वेळी पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटते अन् याचा फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसतो. शासकीय कर्मचाऱ्यांना काही अडचण येऊ नये म्हणून शासन निर्णय घेतो व त्यांचे जिवन आणि नोकरी कशी सुकर होईल यासाठी प्रयत्न सुरू असतात. पण रात्री बेरात्री शेतकऱ्यांच्या शेती पंपाला वीज दिली जाते त्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कोणत्याही क्षणी शेतात जावे लागते. याची मोठी ओरड झाली. यानंतर आम्हीच शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून महायुती शासनाने शेतकऱ्यांना दिवसा लाईट (वीज) देण्याचा निर्णय घेतला, याचा राज्यात जोरदार प्रचार करुन सहानुभूती निर्माण केली. परंतु जसाच पावसाळा संपला आणि शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देण्याची गरज पडली तर दिवसा लाईट मिळेना? लाईट असली तरी ती योग्य दाबाने नाही. दाब (व्होल्टेज) कमी असल्याने शेतकऱ्यांचे पाण्याचे पंप ही चालत नाही असे चित्र आहे. यामुळे शेतकरी आता वीज वीकत द्या पण योग्य दाबात द्या म्हणत आहेत. तर एका ३३/ केव्ही केंद्रातून वीज पुरवठा करताना तीन फिडर असले तर शेतकऱ्यांना एका फिडरवर ८ तास वीज देण्यात येते यामुळे एका फिडरवर सकाळी ८ ते दुपारी ४, दुसऱ्या फिडरवर दुपारी ४ ते रात्री १२ अन् तिसऱ्यावर रात्री १२ ते सकाळी ८ अशी वीज मिळत आहे. अन् जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हेच नियोजन महावितरण कंपनीने केले आहे. यामुळे शासनाचा शेतकऱ्यांना दिवसा लाईट (वीज) देण्याचा निर्णय वांझोटा ठरला आहे. तर स्वतःचा निर्णयाचा शासनाला विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता असे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना दिवसा लाईट म्हणजे बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी असल्याची चर्चा आहे.