बीड सायबर पोलीसांचा ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा;चारजण जेरबंद
पिंपळनेर पोलीस ठाणे पासून हाकेच्या अंतरावर कारवाई
लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील पिंपळनेर येथे बाजार तळावर सुरु असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर गुरुवारी ( दि. २१ ) बीड सायबर पोलीसांनी छापा मारुन धडक कारवाई केली. यावेळी मुद्देमाल सह चारजणांना जेरबंद केले. सदरील कारवाई ही पोलीस ठाणे पासून हाकेच्या अंतरावर केल्याने पिंपळनेर पोलीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी ( दि. २१ ) पिंपळनेर येथील आठवडी बाजार असतो गर्दीचा फायदा घेत येथील बाजार तळावर बीएसएनएल टॉवर जवळ पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाईन चक्री जुगार सुरू असल्याची खात्री लायक माहिती वरुन बीड सायबर पोलीसांनी धडक कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळणारे आणि खेळविणारे असे चारजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. तसेच यावेळी दोन मोबाईल, एक पिसीयू, मॉनेटर सह एम्प्लीफायर, रोख रक्कम असे एकूण ३६ हजार ९०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस नाईक घोलप ( सायबर ) यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत. बीड येथील सायबर पोलीसांना जुगार अड्ड्याची खबर लागते, ते येऊन कारवाई करतात पण स्थानिक पोलीसांना खबरही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. डि.बी. गात, म.पोउपनि टी.एम.खुळे, पो.ना. दत्तात्रय मस्के, पो.ना. गणेश घोलप, आजय जाधव,आमोल दरकर सह सयाबर टीमने केली.