बीड मध्ये पॉवरलिफ्टिंगची मैरी कोम! दोन पदके मिळवून राज्यात उंचावली जिल्ह्याची मान
लोकगर्जनान्यूज
बीड : राज्य पातळीवरील पुणे जिल्ह्यात पार पडलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात बीड येथील प्रिया मुंडे यांनी रौप्य व कांस्य पदक मिळवून राज्यात जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, दोन मुलांची आई असलेल्या मुंडे यांना बीडची मैरी कोम म्हटले जाऊ लागले आहे.
बीड येथील योगा प्रशिक्षक व प्रिया फिटनेसच्या संचालिका प्रिया मंगेश मुंडे यानी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पुर्ण करुन नंतर एमबीए केले. बीड सारख्या जिल्ह्यात राहून पॉवरलिफ्टिंग हा खेळाचा प्रकार करिअरसाठी निवडला आहे. यासाठी मेहनत घेत असून, दोन मुले असतानाही त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत आहेत. यापुर्वीही अनेक स्पर्धांमध्ये प्रिया मुंडे यांनी यश संपादन केले आहे. मागील महिन्यात त्यांची महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र राज्य बेंच प्रेस अजिंक्यपद स्पर्धा २०२२ या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे ऑक्टोबर महिन्यात पार पडली आहे. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात प्रिया मुंडे यांनी पॉवरलिफ्टिंग खेळ प्रकारात रौप्य व कांस्य पदक पटकावले आहे. या कामगिरीबद्दल त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल व त्यांनी राज्यस्तरावर दोन पदके मिळवली या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.