बीड मधील आगळ्यावेगळ्या विवाहाची लगीनघाई सुरू सात मार्चला तृतीयपंथी सपना आणि बाळू लग्नबंधनात अडकणार
लोकगर्जना न्यूज
तृतीयपंथी सपना आणि बाळू धुताडमल यांनी स्वतः पुढे येऊन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर यात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाहचा मुहूर्त साधला आहे. तेव्हा पासून बीड जिल्ह्यात या आगळ्यावेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. ७ मार्च सोमवारी सकाळी ११:३५ वाजता विवाह होणार असून आता केवळ काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे सपनाच्या घरी हळद सह विविध कार्यक्रम सुरू असल्याने या विवाहाची लगीनघाई सुरू आहे. अनेकांनी या लग्नाची जबाबदारी घेतली असून, जेवणाच्या पंगती ही येथे असणार आहेत. अनेक मान्यवरांना खास निमंत्रित करण्यात आले आहे.त्यामुळे या आगळ्यावेगळ्या विवाहाची उत्सुकता बीडकरांना लागली आहे.
बीड शहरातील महिला पत्रकार प्रतिभा गणोरकर, शेख आयशा तसेच संपादक वैभव स्वामी यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील तृतीयपंथी यांचे सत्काराचे आयोजन केले. याची तयारी सुरू असताना अनेकवेळा तृतीयपंथीच्या गाठीभेटी दरम्यान तृतीयपंथी सपना आणि बाळू धुताडमल यांनी आम्हाला लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोन वर्षांपासून आमचं एकमेकांवर प्रेम असून, आम्ही सोबत राहातोत अशी माहिती देत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर सपना आणि बाळूच्या या आगळ्यावेगळ्या विवाहाची बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली. वैभव स्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याची अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती दिली. सर्वांनी पुढाकार घेऊन जवळपास पंधरा ते वीस दिवसांपूर्वी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ( दि. ७ ) मार्च सकाळी ११:३५ वाजताचा मुहूर्त साधण्यात आला. या मुहूर्तावर सोमवारी हा आगळावेगळा विवाह सोहळा कंकालेश्वर मंदिर परिसरात पार पडणार आहे. या विवाहसाठी पहिल्या विवाहित तृतीयपंथी शिवलक्ष्मी संजय झाल्टे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले. शिवलक्ष्मी या आपले पती, सासु सह उपस्थित राहणार आहेत.तसेच तृतीयपंथी आखाड्याचे राज्य व्यवस्थापन प्रमुख श्री. ऋषिकेश महाराज यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे संयोजकांकडून जाहीर करण्यात आले. तृतीयपंथी सपना आणि बाळू धुताडमल यांच्या लग्न घटिकेला काही तास शिल्लक असून, सोमवारी ते दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. यापुर्वीही सर्व रितीरिवाज प्रमाणे जोरदार तयारी सुरू आहे. सपनाच्या घरी उद्या रविवारी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम ही होणार आहे. या लग्नाच्या कन्यादानाची जबाबदारी करणी सेनेने घेतली आहे. तसेच विविध वस्तू, कपडे, मंगळसूत्र, संसारोपयोगी साहित्य सह अनेकांनी पुढे येत जबाबदारी घेतली आहे. या लग्नासाठी येणाऱ्या वऱ्हाडासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे कोणतीही उणीव या लग्नात राहु नये म्हणून संयोजक मेहनत घेत आहेत. तृतीयपंथीचे लग्न ही कदाचित मराठवाड्यातील पहिली घटना असु शकते त्यामुळे याची जोरदार चर्चा असून, अनेकांना उत्सुकता लागली आहे.