बीड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी पीकते …. वाचून बसला ना धक्का…… पण हे खरंय..

बीड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी पिकते असं म्हटलं तर ऐकणाऱ्यांना एक तर धक्का बसेल अथवा सांगणाऱ्या व्यक्तीच्या पत्या गेल्या का? असं विचार मनात येईल परंतु बीड जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची शेती एक शेतकरी करत असून, सध्या दर्जेदार फळ लागली असून त्याची अंबाजोगाई, परळीत विक्रही सुरू आहे. आहे की, नाही कमाल. याबाबत भाजपा नेते नंदकिशोर मुंदडा, केजचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी स्ट्रॉबेरी शेतीला भेट देऊन त्या शेतकऱ्याचा सत्कार केला. यातून बीड जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची शेती होते हे उघडकीस आले.
स्ट्रॉबेरी म्हटले की, थंड हवेच्या ठिकाणी येणारे फळ हे सर्वांना माहीत आहेच तसेच महाराष्ट्राचा विचार केला तर, महाबळेश्वर हे ठिकाण स्ट्रॉबेरी साठी प्रसिद्ध आहे. येथिल वातावरणही त्यासाठी पोषक आहे. अन् बीड जिल्हा म्हटलं की, दुष्काळी जिल्हा, माजलगाव, गेवराई तालुके सोडले तर इतर ठिकाणी पाण्याचा ठणठणाट म्हटलं तर वावगं ठरणार नाही? सध्या एप्रिल महिना सुरू आहे. तापमान इतकं वाढलं आहे की, सुर्य आग ओकतोय असा भास होतो आहे. अशा दुष्काळी व उष्म वातावरण असलेल्या जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते ? म्हटलं तर प्रत्येक ऐकणाऱ्याला हसु आल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे शक्य केलं आहे परचुंडी ( ता. परळी ) या छोट्याशा गावातील सुगंध विश्वनाथ रुपनर या प्रयोगशील शेतकऱ्याने. रूपनर यानी १२ गुंठ्यांत स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे. सध्या त्यास रसाळ असे महाबळेश्वरच्या तोडीचे फळ लागली आहेत. त्याची विक्रीही सुरू झाली आहे. यासाठी ग्लोबल विकास ट्रस्टचे मार्गदर्शन मिळाले आहे. या ट्रस्टच्या शेती अभ्यास सहलीच्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या त्यातून प्रेरणा मिळाली व ट्रस्टचे मार्गदर्शन यामुळे हे शक्य झाले असल्याचे सुगंध विश्वनाथ रुपनर हे त्या व्हिडिओ मध्ये सांगत आहेत. तसेच प्रायोगिक तत्त्वावर सध्या १३ गुंठे क्षेत्रावर लागवड केली या अनुभवातून पुढे क्षेत्र वाढविण्याचा विचार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते. स्ट्रॉबेरीची शेती परचुंडीत होते हे माहित असल्याने भाजपाचे नंदकिशोर मुंदडा, केजचे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, महादेव सुर्यवंशी यांनी सदरील ठिकाणी भेट दिली. तसेच या प्रयोगशील शेतकऱ्याला शुभेच्छा देऊन क्षेत्र वाढवून आम्हाला व परिसरातील नागरिकांना ताजे स्ट्रॉबेरी मिळावी अशी सदिच्छा व्यक्त केली. या भेटीचा व्हिडिओ ही व फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यातून बीड जिल्ह्यातील या स्ट्रॉबेरी शेतीची माहिती मिळाली. स्ट्रॉबेरी शेती पहाता बीड जिल्ह्यातील शेतकरी मेहनती व खूप चिकाटीबाज असून त्यानं ठरवलं तर काहीच अशक्य नाही. परंतु त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी शेती अभ्यासक व पुढाऱ्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.