बीड जिल्ह्यात पुन्हा चंदन तस्करांवर मोठी कारवाई?
बीड : स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या माहितीनुसार आज छापा टाकून मोठ्या प्रमाणात चंदन जप्त केले. जमिन खोदून चंदनाची लाकडे पोलीसांनी बाहेर काढल्याचे समजते. परंतु याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर माहिती मिळेल असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
यापुर्वीही काही दिवसांपूर्वी चंदन तस्करांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये केज येथील नवनिर्वाचित नगर पंचायतीच्या सदस्याचे नाव आल्याने ही कारवाई चांगलीच गाजली. या पाठोपाठ आज स्थानिक गुन्हे शाखेने गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील एका वस्तीवर दुपारी साडेबाराच्या सुमारास छापा मारला. गुप्त खबऱ्या कडून स्थानिक गुन्हे शाखेला येथे अनेक जण चंदन तस्करीमध्ये सहभागी असून, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे छापा मारला घरांची झडती घेत परिसरात ही शोध घेण्यात आला. काही ठिकाणी जमिन खोदून त्यातून चंदनाची लाकडे काढण्यात आली. काही संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्या माध्यमातून काही हाती लागतंय का? हे ही प्रयत्न सुरू आहेत. परंतु ही कारवाई अद्याप पुर्ण झाली नसून कायदेशीर प्रक्रिया व पंचनामा झाल्यानंतर पुर्ण माहिती मिळेल. नेमके किती चंदन जप्त केले, आरोपी कोण? हे नंतर समजणार आहे.