बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळीचा कहर; वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन जनावरे दगावली

लोकगर्जनान्यूज
बीड : रविवारी व सोमवारी जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रविवारी अंबाजोगाई तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर एक म्हैस दगावली आहे. तसेच सोमवारी बीड शहरात अवकाळी पाऊस आणि मोठ्या प्रमाणात वारे असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विद्युत तारा तुटल्याने जवळपास चार तास वीजपुरवठा खंडित झाला. पोलीस पेट्रोल पंपावरील पत्र्याचे छत कोसळल्याने नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा शहराला चांगलाच फटका बसल्याचे चित्र दिसून आले. सोमवारी नांदूरघाट येथे एक गाय दगावली आहे.
रविवारी दि.११ सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव व सुगाव येथेही अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान वीज कोसळून सायगाव येथील शेतकरी दिगंबर गायकवाड (वय ५९) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सुगावा येथे वीज कोसळून पठाण मोहसीन सत्तार यांची म्हैस दगावली आहे. तसेच सोमवारी (दि.१२) बीड शहरासह विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. शहरात मोठ्या प्रमाणात वारे असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी विद्युत तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच शहरातील बालेपीर भागातील पोलीस पेट्रोल पंपाचे पत्र्याचे छप्पर उन्मळून पडले आहे. तसेच नवीन बांधकाम झालेले पोलीस वसाहतीतील खीडक्या हवेमुळे वाकड्या झाल्या आहेत. यामुळे शहराला अवकाळीने चांगलाच तडाखा दिल्याचे दिसून येत आहे. तर सोमवारीही केज तालुक्यातील नांदूरघाट येथे वीज कोसळून गाय दगावली आहे.