बीड जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड! सख्खे बहीण-भाऊ रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले
बीड : वृद्ध सख्खे बहिण-भाऊ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले असून प्रथम दर्शनी त्यांना दगडाने ठेचून मारल्याचे दिसून येत आहे. या दुहेरी हत्याकांड मुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सुब्राबाई ग्यानबा मुंडे ( वय ५५ वर्ष ), सटवा ग्यानबा मुंडे ( वय ६० वर्ष ) रा. जिरेवाडी ता. परळी मयताचे नावं आहेत. हे दोघे नात्याने बहीण-भाऊ आहेत. हे दोघेही रात्री शेतातून घरी आले नाही. त्यामुळे आज सकाळी नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहिले असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. प्रथम दर्शनी या दोघांनाही दगडाने ठेचून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती परळी ग्रामीण पोलीसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी येथील शासकीय दवाखान्यात आणण्यात आले आहे. पोलीस यांची हत्या का व कोणी केली? याचा शोध घेत आहेत. बहीण-भावाच्या हत्येची घटना उघडकीस येताच परळी सह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.