बीड जिल्ह्यात दरोडा; दोघांना मारहाण करत मोठी रक्कम व दागिने चोरले
लोकगर्जना न्यूज
बीड : तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या वडवाडी येथे दरोडा पडल्याची घटना सकाळी उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी दोघांना मारहाण करुन रोख ९ लाख रुपये व ५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस व एलसीबी पोचली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, अभिमान शाहूराव अवसर रा. वडवाडी ( ता. बीड ) यांच्या घरी बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा जण हातात धारदार शस्त्र घेऊन घरात घुसले. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. शस्राचे धाक दाखवून घरातील रोख ९ लाख रुपये व ५ तोळे सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले असल्याचे सांगितले जात आहे. पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नेकनूर पोलीस व एलसीबिचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ते पुढील तपास करीत आहेत. याबाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर नेमका किती ऐवज व रक्कम चोरीला गेली हा अधिकृत आकडा समोर येईल. या दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ठसे तज्ञ, श्वानपथक पाचारण करण्यात आले आहे. बीड पोलीस दरोडेखोरांचा तपास करीत आहेत.