बीड जिल्ह्यात थरार! बीड तालुक्यात महिलेचा खून, घरफोडी तर गेवराई तालुक्यात डोक्यात कुऱ्हाड घातली
लोकगर्जना न्यूज
रंजेगाव ( ता. बीड ) येथे महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला असून याप्रकरणी संशयित म्हणून पोलीसांनी पतीला ताब्यात घेतले. कामखेडा ( ता. बीड ) येथे घरफोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने असा जवळपास दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. तसेच गेवराई येथील हाके वस्तीवर शेतीच्या वादातून एकाच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन गंभीर जखमी केले. या तीन गुन्हेगारीच्या घटनांनी बीड जिल्हा हादरून गेला.
सुत्रांच्या माहिती नुसार, बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेचा चोरट्यांनी गळा दाबून खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक, एलसीबी पथक व पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहाणी करून चौकशी केली असता. ज्योती दिनेश आबुज ( वय २९ वर्ष ) रा. रंजेगाव असे असल्याचे समजले. पहाटे चोरट्यांनी घरात घुसून मारहाण केली. लेकरांना आणि मला बांधून टाकले, पत्नी ज्योतीचा गळा दाबून खून केला. अशी माहिती मयत महिलेचा पती दिनेश पांडुरंग आबुज याने पोलीसांनी दिली. परंतु घटनास्थळी पाहाणी करताना पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांना पतीवरच संशय आला. त्यास ताब्यात घेऊन उलटतपासणी केली असता त्याने पत्नी ज्योतीचा खून केल्याचे कबुली दिली. परंतु खून का केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करीत आहेत. दुसरी घटना बीड तालुक्यात कामखेडा येथे धाडसी घरफोडीची समोर आली. नवनाथ शिंदे हे आपल्या कुटुंबासह देवदर्शनाला गेलेले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी, कोंडे तोडून आत शिरले आतील रोख ३६ हजार रुपये, १ लाख ६० हजारांचे सोन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख ९६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना गेवराई हाके वस्ती येथून उघडकीस आली. बांध कोरल्याच्या कारणावरुन सहा जणांनी संगनमत करून लोखंडी गज, काठ्या, कुऱ्हाडीने हल्ला चढवला. यावेळी विष्णू गरदरे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केले. इतरांना गज व काठ्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पांडुरंग गरदरे यांच्या तक्रारीवरून आरोपी विनायक रंगनाथ पांढरे, गजानन विनायक पांढरे, संजय विनायक पांढरे, माणिक रंगनाथ पांढरे, सुनील माणिक पांढरे, अंकुश रंगनाथ पांढरे सर्व रा. हाके वस्ती ( ता. गेवराई ) या सहा जणांवर चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.