बीड जिल्ह्यात खळबळ! पत्नीकडून पतीची हत्या: दोन दिवसांत दोन घटना
लोकगर्जनान्यूज
बीड : एकीने पती पसंत नसल्याने अंगावरची हळद निघण्यापूर्वी तर दुसरीने दारुच्या व्यसनाला कंटाळून पतीचा खून केल्याच्या दोन दिवसात दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या घटना जिल्ह्यातील गेवराई आणि परळी तालुक्यात घडल्या आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील निपाणी जवळकातांडा येथील मयत पांडुरंग राजाभाऊ चव्हाण या तरुणाचा अवघ्या २२ दिवसांपूर्वी विवाह झाला. परंतु नवविवाहीतेला पांडुरंग पसंत नव्हता. त्यामुळे पत्नीने झोपेत असलेला पती पांडुरंग चव्हाण यांचा गळा दाबून खून केला. व ते बेशुद्ध पडल्याचे सांगितले. परंतु मयताच्या आईच्या तक्रारीवरून मयताच्या पत्नी विरोधात खूनाचा गुन्हा गेवराई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच आज परळी तालुक्यातून पत्नीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली. मयत हनुमान अशोक काकडे ( वय ३० वर्ष ) गोवर्धन हिवरा ( ता. परळी ) यास दारुचे वेसन होते. हनुमान काकडे हा ११ नोव्हेंबर रोजी दारु पिऊन घरी आला. या कारणावरून पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. याच रात्री हनुमान झोपत असताना पत्नीने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. यानंतर दोरी घराच्या छताला अडकवून आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतु शवविच्छेदन अहवालातून हनुमान काकडेचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असल्याचे समोर आले. यानंतर पतीचा खून केला म्हणून पत्नीवर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनेचा तपास गेवराई व सिरसाळा पोलीस करीत आहेत. दोन दिवसांत दोन घटना उघडकीस आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.