बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकाच छताखाली माहिती अन् योजना
कृषी भवन साठी १४ कोटी ९० लाखांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एका छताखाली सर्व योजना व माहिती मिळावी यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी भवनाचा प्रस्ताव मागविण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता देत सर्व सुविधा युक्त कृषी भवन बांधकासाठी शासनाने १४ कोटी ९० लाखांचा आराखडा मंजूर केला.
बीड येथे पालवन रस्त्यावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आहे. येथे अनेक विभाग असले तरी कृषी संबंधित अनेक कार्यालय इतरत्र असल्याने शेतकऱ्यांना अनेक वेळा या वेगवेगळ्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. शेतकऱ्यांची ही अडचण ओळखून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी भवनाचा प्रस्ताव मागविला होता. कृषी अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्याच्या कृषी विभागाकडे सादर केला. या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता देत सर्व सुविधा युक्त अशा टोलेजंग कृषी भवन इमारतीसाठी १४ कोटी ९० लाख रुपयांच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कृषी भवनाचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. जिल्हा स्तरावर आपल्या कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा, विविध योजना व पूरक आवश्यक बाबी एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी हे कृषी भवन उपयुक्त ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.