बीड जिल्ह्यातील या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतीचे नुकसान तर पुल वाहून गेला
लोकगर्जना न्यूज
माजलगाव : तालुक्यातील मोगरा येथे गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले तर पुलही वाहून गेला. या पुलावरुन एक महिला पुरात वाहून गेली परंतु पोहता येत असल्याने मोठा अनर्थ टळला.
मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाले असून, मोगरा ( ता. माजलगाव ) येथे गुरुवारी ( दि. ४ ) रात्री ढगफुटी सदृश्य असा जोरदार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. गोदावरी नदी दुथडी भरून वाहीली. यामुळे एक पुलही वाहून गेला असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. पुलावरुन पाणी वाहत असल्याने तो वाहून गेल्याचा अंदाज न आल्याने पुल ओलांडताना सोनाली सखाराम बिजुले ही मच्छीमारांची महिला वाहून गेली. परंतु त्यांना पोहता येत असल्याने त्या नदीच्या काठावर आल्याने मोठा अनर्थ टळला. जोरदार पाऊस झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.