बीड जिल्ह्यातील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू
एकीचा मळणी यंत्रांत अडकून तर दुसरीचा खून; तिसरीने केली आत्महत्या

लोकगर्जना न्यूज
बीड शहरातील प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांच्या अपघाती मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्ती केली जात असताना आज गुरुवारी जिल्ह्यातील तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यातील दोन महिला गेवराई तर एक महिला आष्टी तालुक्यातील आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यात संगम जळगांव येथे बाजरीची मळणी यंत्राद्वारे चालू असताना मळणीसाठी बाजरी यंत्रामध्ये टाकताना अचानक यंत्रामध्ये अडकून सुमित्रा सुदाम पांगरे ( वय ३० वर्ष ) यांचे शिर धडा वेगळे झाले . यात त्यांचा जागिच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. दुसरी आष्टी तालुक्यातील असून, मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले ( वय २३ वर्ष ) रा. शेरी बुद्रुक ( ता. आष्टी ) असे मयत महिलेचे नाव आहे. मनिषा या कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. बुधवारी ( दि. ११ ) आपल्या शेरी बुद्रुक येथील घरी परतली. कुठे गेली होती असा जाब विचारत पती, सासरा व दिराने बेदम मारहाण केली. यामध्ये मनिषा उर्फ सोनाली बाबासाहेब वाघुले या महिलेचा मृत्यू झाला. सदरील घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मयत महिलेची बहिण अश्विनी रमेश राळेभात रा.जामखेड ( जि.अहमदनगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात पती बाबासाहेब अशोक वाघुले , सासरा अशोक नारायण वाघुले , दीर प्रकाश अशोक वाघुले यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला . पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे तपास करीत आहेत . तिसरी घटना पाचेगाव ( गेवराई ) येथील असून, आज गुरुवारी ( दि. १२ ) सकाळी १० विवाहितेने घरापासून जवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिला वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही. हिना सुरेश राठोड ( वय २५ ) वर्ष असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. एकाच दिवशी तीन महिलांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.