बीड जिल्ह्यातील चार राष्ट्रीय महामार्गाची निविदा; लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी रस्त्याची उपेक्षाच!
आडस, धारुर, वडवणी, पिंपळनेर, कुक्कडगावच्या नागरिकांना प्रतिक्षाच
लोकगर्जना न्यूज
बीड जिल्ह्यात चार नवे राष्ट्रीय महामार्ग होत असून या रस्त्यांची निविदा प्रसिद्ध झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. परंतु जनतेच्या सोयीचा तसेच इंधनाची बचत करणारा लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी या ८४ कि.मी. रस्त्याचा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे स्वप्न पहात असलेल्या आडस, धारुर, चिंचवण,वडवणी, ताडसोन्ना, पिंपळनेर, कुक्कडगाव येथील नागरिकांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.
परळी ते सिरसाळा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट असून तसाच तो पुढे बीड पर्यंत असणार आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी २३५ कोटीची तरतूद आहे. हा रस्ता चौपदरी होणार आहे. या रस्त्यासह जिल्हयातील ज्या चार महामार्गाची निविदा प्रसिद्ध झाली आहे, त्यात साबलखेड- आष्टी – चिंचपूर- जामखेड २१२ कोटी ७० लाख, जामखेड ते सौताडा १३६ कोटी, शिरापूर/नवगन राजुरी जंक्शन ते शिवाजी चौक बीड आणि बार्शी नाका ते जरूड फाटा १८४ कोटी ७६ लाख अशी एकूण ७६८ कोटी ४६ लाखाची ही कामे आहेत. या रस्त्यांची निविदा ही प्रसिद्ध झाली. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.यापुर्वी ही जिल्ह्यात परळी ते धायगुडा पिंपळा, अहमदपूर, अंबाजोगाई, मांजरसुंबा पुढे अहमदनगर पर्यंत रस्ता झाला आहे. तसेच खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग माजलगाव, धारुर, केज तालुक्यातून गेलेला आहे. परंतु हैदराबाद, लातूर, औरंगाबाद, जालना यांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असलेला लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी हा रस्ता आहे. हा राज्य रस्ता असून २३२ असा क्रमांक आहे. परंतु याची अवस्था पाहिली असता पांदण वाट बरी अशी झाली. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाची तत्वतः मान्यता मिळाली आहे. केंद्र शासन हा रस्ता करणार म्हणून राज्याचे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. केंद्राकडून तत्वतः मान्यतेच्या पुढे कारवाई सरकत नाही. त्यामुळे या ८४ कि.मी. रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे केवळ अवशेष शिल्लक आहेत. २३२ राज्य रस्ता जर चांगला झाला तर लातूर ते औरंगाबादचे जवळपास ३० कि.मी. अंतर कमी होऊ शकतो. दररोज शेकडो वाहने लातूर-, औरंगाबाद अथवा या मार्गाने पुढे जातात. ही वाहनांची वाहतूक लोखंडी सावरगाव फाटा ते पाडळसिंगी रस्त्यावरून झाली तर दररोज हजारो लिटर इंधन वाचेल. यातून वाहनांसह देशाचा ही फायदा होणार आहे. परंतु यासाठी सध्यातरी कोणीही बोलण्यास तयार नाही. केवळ लोकप्रतिनिधींच्या अनेस्थेमुळे हा रस्ता रेंगाळत पडलेला. इतर रस्ते होत असताना हाच रस्ता मागे का रहात आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दररोज खड्डेमय रस्त्याने प्रवास करुन मनक्याचे आजार जगण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने या रस्त्यावरील ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा बांध फुटणार? असे दिसून येत आहे.