बीड जिल्ह्यातील चार गुंडांची हर्सूल कारागृहात रवानगी
अंबाजोगाई, माजलगाव,बीड,वडवणी येथील गुंडाचा समावेश

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई,बीड येथील गंभीर गुन्हे दाखल आणि दहशत असलेल्या चार गुंडांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन या चौघांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी लावलेला मकोका,एमपीडीए कारवायांचा धडाका पाहून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांनी धसका घेतल्याचे दिसून येत आहे.
तारेख खान मुसा खान (वय 28 वर्षे) रा. फुलेनगर, माजलगाव, विशाल माणिक डांबे (वय 24 वर्षे) रा. बाहेगव्हाण ता. वडवणी, गजाजन सुभाष जाधव (वय 38 वर्षे) रा. राडी तांडा ता. अंबाजोगाई, गणेश भारत गिरी (वय 23 वर्षे) रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नगर रोड, बीड या चौघांवर माजलगाव शहर, वडवणी, अंबाजोगाई ग्रामीण, शिवाजीनगर बीड या पोलीस ठाण्यात अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या भागात या चौघांची सामान्य लोकांमध्ये मोठी दहशत आहे. या भागात शांतता निर्माण होण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी यांना संबंधितांविरुद्ध एमपीडीएचा प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले. याचे अवलोकन करुन सदरील प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. सदर प्रकरणात श्री. विवेक जॉन्सन नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी बीड यांनी रविवारी (दि. ११) सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत आदेश पारीत करून बीड जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधीत राहावी हा उदात्त दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन सदर चार ही इसमास तात्काळ ताब्यात घेवून हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे हजर करून स्थानबद्ध करणे बाबत आदेश पारीत केले होते. यानंतर संबंधित चौघांनाही ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.