बीड जिल्ह्याच्या पैलवानाची सुवर्ण कामगिरी: महाराष्ट्राचं नेतृत्व अन् सुवर्णपदक दुहेरी कामगिरीने शान वाढवली
लोकगर्जनान्यूज
माजलगाव : सध्या मध्यप्रदेश राज्यात खेलो इंडिया युवा स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत ७१ किलो वजन गटात ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात माजलगाव ( जि. बीड ) येथील सुमितकुमार अप्पासाहेब भारस्कर यांनी प्रतिस्पर्धी पंजाबचा मल्ल मनजोत सिंग यांचा ११-७ असा पराभव करुन सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत सुवर्ण पदक मिळवून दुहेरी कामगिरीने बाजावल्याने यशाबद्दल माजलगावसह जिल्हा भरातील कुस्ती प्रेमितून कौतुक केले जात आहे. सुमितकुमार हा सामान्य ऊसतोड मजूर कुटुंबातील असल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
सुमितकुमार बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराला लागून असलेल्या शेलापूरी येथील रहिवासी असून त्यांचे वडील अप्पासाहेब भारस्कर ऊसतोड मजूर आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थिती असतानाही मुलाला सर्वोतकृष्ट मल्ल बनवण्याचे स्वप्न त्यांचं आहे. या स्वप्नाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. या यशस्वी कामगिरीतून त्याने दाखवून दिले. खेलो इंडिया युवा स्पर्धेत सुमितकुमार भारस्कर आणि पंजाबचा मल्ल मनजोत सिंग या दोघांमध्ये ७१ किलो वजन गटातून ग्रीको रोमन कुस्ती झाली. ही लढत अत्यंत चुरशीची ठरली. यामध्ये सुमितकुमार ( माजलगाव जि. बीड ) यांनी ११-७ असा प्रतिस्पर्धी मल्लाचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले आहे. ही लढत शुक्रवारी ( दि. १० ) रोजी झाली आहे. माजलगावच्या मातीतील युवकाने हे यश संपादन केल्याने स्थानिक कुस्ती पटूसह बीड जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे. यावेळी सुमितकुमार प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सुवर्णपदक जिंकणार असा आत्मविश्वास होता. लढत खूप आव्हानात्मक होती. संयम ठेवत प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे संयम राखून खेळलो व सुवर्णपदक मिळविले. यांचे पुर्ण श्रेय माझे प्रशिक्षक व पालकांना असल्याचे सांगून त्यांनाच याचे पुर्ण श्रेय दिले.