बीड जिल्हा बँकेचा अजब कारभार पीक विमा रक्कम २ हजाराने शेतकऱ्यांची बोळवण
नशीबाने मिळालेला पीक विमा बँकेने अडवल्याचे चित्र

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अनेक शेतकऱ्यांचा विमा खात्यावर जमा झालेला आहे. परंतु येथील शाखेत रक्कम काढण्यासाठी जाणाऱ्यांची केवळ २ हजारांवर बोळवण केली जात आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला जात आहे. तर नशीबाने मिळालेला पीक विमा जिल्हा बँकेने अडवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पावसाची दडी, येलोमोझ्याक , अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपनीने सरसकट विमा द्यावा अशी शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची मागणी आहे. परंतु कंपनी आपल्या मतावर ठाम असून कोणाला विमा मिळाला तर कोणाला नाही. तसेच १२ हजार शेतकऱ्यांना विमा रक्कम चुकून गेल्याचे सांगत त्या शेतकऱ्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले. यासह आदि कारणांमुळे बीड जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न मोठा गाजत आहे. यासाठी अनेक आंदोलने झाली. परंतु अद्यापही यावर समाधान कारक असा निर्णय घेण्यात आला नाही. या जाचक अटी,नियमांची पुरतात केल्यानंतर काही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यामुळे हा हक्काचा विमा नशीबाने मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेचे खाते आहेत त्यांच्यावरील संकट अद्याप टळले नाही असे दिसून येत आहे. आडस ( ता. केज ) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खात्यावरील रक्कम काढण्यासाठी जाणाऱ्यां शेतकऱ्यांना अजब अनुभव येत आहे. विमा पोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ७,९,२०,३० हजार अशी रक्कम आहे. स्लिप भरली की, त्यातील फक्त २ हजार रुपये दिले जात आहे. यासाठी कॅश नसल्याचे कारण सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी मागील आठ-दहा दिवसांपासून बँकेच्या वाऱ्या करत आहेत. हक्काचे पैसेही मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले असून जिल्हा बँकेच्या गलथान कारभारा विरुद्ध असंतोष पसरला आहे.
चौकट————–
रक्कम आली की, वाटप करु – शाखा व्यवस्थापक
आमच्या कडे सध्या रक्कम नाही. आली की, वाटप या व्यतिरिक्त एकही शब्द न बोलता येथील शाखा व्यवस्थापक कल्याण केकाण यांनी बोलने टाळलं.
———————————
माझे पहिले १० हजारहून जास्त व खरीप पीक विम्याचे ३० हजार असे जिल्हा बँकेच्या शाखेत ४० हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम आहे. मला अडचण असल्यामुळे बँकेत रक्कम काढण्यासाठी गेलो असता केवळ २ हजार रु. घेऊन जा असे सांगितले.
बन्सी शिवाजी पत्रवाळे
शेतकरी,आडस ता.केज
————————————
माझे आडस येथील जिल्हा बँकेच्या शाखेत दोन खाते आहेत. त्यातील एका खात्यावर ७ व दुसऱ्या खात्यावर ९ हजार अशी पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. सदरील खात्यावरील रक्कम काढण्यासाठी मी शनिवारी ( दि. ४ ) बँकेत गेलो तर मला २ हजार रुपयांची स्लिप भरण्यास सांगितले. त्यामुळे मी पैसे न उचलता परत आलो. रक्कम खात्यावर जमा असताना शेतकऱ्यांची अशी अडवणूक जिल्हा बँक का करत आहे?
राजेभाऊ लाखे
शेतकरी,खोडस ता.धारुर