बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन
लोकगर्जनान्यूज
बीड : राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्या संदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष मंत्रालय, मुंबई येथे स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याकरिता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येत आहेत.
तसेच सदर कार्यवाहीमध्ये जास्तीत जास्त व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवुन परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यासाठी सूचित केले आहे.
त्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून, सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे स्वीकारण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे सांगितले आहे.