बीड जवळ टेम्पो व दुचाकीचा अपघात; दोन ठार
लोकगर्जना न्यूज
बीड : बांधकाम मिस्त्री व मजुर महिला एका दुचाकीवरून जाताना टेम्पोची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना आज दुपारी बीड शहरापासून जवळच मांजरसुंबा रस्त्यावरील बायपास चौकात घडली.
कालिदास विठ्ठल जाधव ( वय ३८ वर्ष ) रा. शेलगाव गांजी ( ता. केज ) बांधकाम मिस्त्री तसेच मजुर महिला अनिता भारत सरपते रा. धानोरा रोड, बीड असे मयत दोघांची नावे आहेत. हे दोघे मांजरसुंबा येथे बांधकामावर चालले होते. दरम्यान ते बीड शहराच्या बाहेर येताच बायपास जोडला जातो त्या चौकात आले असता आयशर टेम्पो व या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक होताच दुचाकी टेम्पोच्या खाली अडकून लांबपर्यंत फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे तर, महिलेचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त टेम्पो बाजुला सारुन वाहतूक सुरळीत केली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी नियमित अपघाताच्या घटना घडत असल्याने येथे उड्डाण पूल करावं अशी मागणी केली जात आहे.