बीडमध्ये व्यापाऱ्याच्या घरात चोरी; ४० तोळे सोन व रोकड लंपास

लोकगर्जना न्यूज
बीड : शहरातील एका व्यापाऱ्याच्या घराचा छताचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने व रोख १ लाखाची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधिक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पेठ बीड पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पेठ बीड मधील शनिमंदीर परिसरात व्यापारी भगीरथ मोहनलाल चरखा यांचे घर आहे. रविवारी ( दि. ३ ) रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या छतावर चढून वरील दरवाजा तोडून घरात घुसले. आतील रोख १ लाख रुपये व ४० तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. सकाळी झोपेतून उठल्यावर ही घटना उघडकीस आली. यानंतर पेठ बीड पोलीसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक, पेठ बीड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी भेट दिली. यानंतर चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक, ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.