बीडमध्ये ग्रामसेवकांचा गौरव तर आष्टीत बेड्या; लाच मागितली म्हणून ग्रामसेविकेवर एसीबीची कारवाई
लोकगर्जना न्यूज
बीड : मयत वडिलांच्या नावावरील असलेल्या प्लॉटच्या उताऱ्याची मागणी मुलाने केली होती. तो उतारा देण्यासाठी ग्रामसेविकेने तीन हजार रु. लाचेची मागणी केली. याप्रकरणी एसीबीने ग्रामसेविका व एका खाजगी व्यक्तीवर पोलीसात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे आज बीड येथे आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव होत आहे. तर, आष्टी येथे या ग्रामसेविकेला लाच मागितली म्हणून बेड्या मिळत आहेत.
तक्रारदाराने मयत पित्याच्या नावावरील प्लॉटचा उताऱ्याची मागणी ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव घाट ( ता. आष्टी ) कडे केली. हा उतारा देण्यासाठी कार्यरत ग्रामसेविका सोनाली अरविंद साखरे ने तीन हजार रु. लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधिताने बीड एसीबी कडे तक्रार केली. बीड एसीबी कार्यालयाने यातील सत्यता पडताळून पाहिली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यामुळे एसीबीने अंभोरा पोलीस ठाण्यात ग्रामसेविका सोनाली अरविंद साखरे व खाजगी इसम चांगदेव दळवी या दोघा विरूद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे आज २००९ पासून आदर्श ग्रामसेवक म्हणून घोषित करण्यात आलेल्या ११९ जणांचा बीड येथे गौरव होत आहे. याच दिवशी महिला ग्रामसेवकावर एसीबीची कारवाई झाली.