बीडमध्ये खून: मोबाईल चोरी कनेक्शनचा संशय एक ताब्यात
लोकगर्जना न्यूज
बीड : येथील खंडेश्वरी भागातील तंत्रनिकेतन महाविद्यालय जवळ एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. हा प्रकार चोरीच्या मोबाईल विक्रीतून आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात हलविले आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी भेट दिली. पोलीसांनी घटनास्थळावरून एकास ताब्यात घेतले आहे.
सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,उतरेश्वर हौसराव भोसले ( वय २५ वर्ष ) रा. बोरखेड ( ता.बीड ) असे मयताचे नाव आहे. आज मंगळवारी ( दि. १९ ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास डायल ११२ वर एक कॉल आला. त्यावरून गणेश बोलत असल्याचे सांगून शहरातील खंडेश्वरी परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जवळ पिंपळनेर रस्त्यालगत दगडाने ठेचलेल्या अवस्थेत एक तरुण पडलेला आहे अशी माहिती दिली. घटनेने गांभीर्य ओळखून डायल ११२ ने याची माहिती मार्शल १ वर कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसून आलं, त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. यानंतर पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, पेठ बीड ठाण्याचे केदार पालवे, आदि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून दिपक संतोष भोर ( वय २१ वर्ष ) रा. लोणारपूरा बीड असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेने बीड शहरात एकच खळबळ माजली आहे.