बाबूराव बागूल कथा पुरस्कार बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ कथा संग्रहास जाहीर
आडस च्या सुपुत्राच्या कथासंग्रहाची राज्याच्या साहित्य क्षेत्राने घेतली दखल
केज : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने दिला जाणारा सन-२०२० चा बाबूराव बागूल कथा पुरस्कार बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ कथा संग्रहास शनिवार (ता.०९) रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बालाजी सुतार यांचे तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील आडस येथील सुपूत्र कथा, कविता, नाटक व संवाद लेखक बालाजी सुतार यांच्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने दिला जाणारा सन-२०२० चा बाबूराव बागूल पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख व विद्यार्थी कल्याण मंडळाच्या अध्यक्षा विजया पाटील यांनी केली आहे. यापूर्वीही या कथा संग्रहास चार महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप रोख एकवीस हजार, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. बालाजी सुतार हे आजच्या पिढीतील महत्वाचे लेखक आहेत. शब्द प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ या पहिल्याच कथासंग्रहातून मराठी लघुकथेला एक नवा आयाम दिला आहे. आशययुक्त विलक्षण भाषाशैली, नव्या बदललेल्या जगाकडे पाहण्याची अनोखी दृष्टी, ग्रामीण भागातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण आणि कथावस्तूतील विषय वैविध्य हा लेखक आपल्या कथांमधून मांडतो. पुरस्कार निवड समितीत डॉ. प्रज्ञा पवार, डॉ. गिरीष लांडगे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विजया पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील व प्रमोद बोरसे यांचा समावेश होता. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. लवकरच नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.