बहूजन समाजाचे प्रेरणास्थान हजरत टिपू सुलतान यांच्या अवमान प्रकरणी दोषींविरूद्ध गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा
बहुजन मुक्ती पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन ; धरणे आंदोलन
अंबाजोगाई : समस्त बहूजन समाजाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हजरत टिपू सुलतान यांच्या अवमान प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते आ.देवेंद्र फडणवीस यांचेविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई करा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने राज्याचे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.याप्रश्नी बुधवार,दिनांक २ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,आपल्या महाराष्ट्र राज्याला सामाजिक,सांस्कृतिक संघर्षाचा व गौरवशाली इतिहासाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा
फुले,लोकराजे राजर्षी
शाहू महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे.काही संघटना व या संघटनांचे प्रचारक,प्रवक्ते नेहमीच देशातील नागरिकांचे मूलभूत व प्रासंगिक मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम असा संघर्ष उभा करताना दिसून येतात.यासाठी ते सातत्याने बेताल वक्तव्य करीत असतात व यामध्ये प्रामुख्याने बहुजन समाज ज्यांना आपला प्रेरणा पुरूष मानतो अशा महापुरूषांची,महानायकांची बदनामी नेहमीच करताना दिसून येतात.विद्यमान महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते आ.देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान यांचेबाबत अवमानकारक वक्तव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत.अशोभनीय कृत्य करून आ.देवेंद्र फडणविस हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे तसेच धार्मिकदृष्ट्या वातावरण कलुषित करून हिंदू-मुस्लिम असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.हजरत टिपू सुलतान यांच्याविषयी त्यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत.एकंदरीत काही संघटना या बहुजन समाजातील महापुरूष,महानायिका यांच्याबद्दल प्रचंड आकस आणि द्वेष आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य करून वारंवार तो प्रकट करताना दिसून येतात.वास्तविक पाहता हजरत टिपू सुलतान हे मुलनिवासी बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी लढणारे योद्धे होते.त्यांच्या कार्याविषयी संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे.१) हजरत टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा बहुजन विरोधी नव्हते.,२) टिपू सुलतान यांनी अनेक हिंदु मंदिरांना मदत केलेली आहे.,३) शृंगेरी मंदिर (मठ) वाचविण्यासाठी देखिल हजरत टिपू सुलतान यांनी मदत केली होती.,४) प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेला बहुजन (हिंदू) महिलांचा संपूर्ण वस्त्र परिधान करण्याचा अधिकार हजरत टिपू सुलतान यांनीच पुन्हा त्यांच्या प्रजेतील महिलांना बहाल केला.,५) हजरत टिपू सुलतान यांच्या सैन्यात ६०% टक्के बहुजन (हिंदू) सैन्य होते.यावरून असे सिद्ध होते की,टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा हिंदूंचे शञू नव्हते.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य हे मुलनिवासी बहुजनांच्या भावना दुखावणारे असून ते निषेधार्ह आहे.म्हणून धार्मिक,सामाजिक तेढ निर्माण केल्यावरून आ.देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी हे एकदिवसीय आंदोलन समस्त बहुजन समाजाच्या वतीने संवैधानिक पद्धतीने करीत आहोत.जर आ.देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन उचित कारवाई करण्यात आली नाही.तर संघटनेकडून येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात राज्यव्यापी व राष्ट्रव्यापी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व यातून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल.या आंदोलनामधे छत्रपती क्रांती सेना,बहुजन मुक्ती पार्टी,बहुजन क्रांती मोर्चा व इतर बहुजन समाजातील संघटनांचा समावेश आहे.एकदिवसीय धरणे आंदोलन हे अंबाजोगाई तालुक्यासह महाराष्ट्रातील ३६ जिल्हे आणि ३७६ तालुक्यात एकाच वेळी करण्यात आले.बुधवार,दिनांक २ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनात आणि निवेदन देताना बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष नासेर शेख,तालुकाध्यक्ष निसार सिद्दीकी,राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघाचे ज्योतीताई मिसाळ (बीड),रणजित मस्के (राष्ट्रीय मोर्चा),व्यंकटेश गडदे (जिल्हाध्यक्ष,मौर्य क्रांती संघ.),रमेश गडसिंग (भारतीय बेरोजगार मोर्चा),राजेश कोकाटे(तालुका महासचिव,बहुजन मुक्ती पार्टी),गुणाजी वाव्हळे (भारतीय बेरोजगार मोर्चा),फहीम शेख (एमआयएम,अंबाजोगाई.) हे उपस्थित होते.