बजरंग सोनवणे मित्रमंडळाची तातडीची बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
लोकगर्जनान्यूज
केज : खासदार प्रितम मुंडे यांच्या विरोधात २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविणारे बजरंग सोनवणे यांनी मित्रमंडळाची तातडीची बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपाने उमेदवार घोषित केल्यानंतर ही बैठक बोलवण्यात आली असल्याने पुन्हा मुंडे-सोनवणे लढत होणार की, काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
बजरंग सोनवणे हे येडेश्वर ॲग्रो उद्योगाचे प्रमूख असून, ते कृषीमंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, विश्वास असल्याने २०१९ मध्ये धनुभाऊ मुळेच बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. तेव्हा प्रितम मुंडे,बजरंग सोनवणे अशी चुरशीची लढत झाली. यात विजय प्रितम मुंडे यांचा अपेक्षित झाला. या २०२४ च्या निवडणूकीत पक्षाने प्रितम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना दिले. पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच जनतेचे लक्ष राष्ट्रवादी कडे लागले. राष्ट्रवादी आता कोणता उमेदवार देणार? तो पंकजा मुंडे यांच्या तोडीचा असणार का? असे प्रश्न आहेत. थोरले पवार साहेब जिल्ह्यात उमेदवार शोधत असून, अनेकजण लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक आहेत . पण अद्याप पवार साहेबांनी उमेदवार घोषित केला नाही. उद्या,किंवा परवा राष्ट्रवादीसह आघाडीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. या आगोदरच बजरंग सोनवणे यांनी मित्रमंडळाच्या नावाने शुक्रवारी ( दि. १५ ) कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टरवर फक्त बजरंग सोनवणे यांचा एकच फोटो आहे. त्यामुळे ते वेगळा निर्णय घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित ते शरद पवार गटात प्रवेश करुन यंदाही लोकसभेचे उमेदवार असतील का? अशी चर्चा आहे. सोनवणे काय निर्णय घेणार? याकडे केज तालुक्यासह बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.