बंडाळी शमविण्यासाठी अन् चांगले उमेदवार शोधण्यासाठी ‘पुढाऱ्यांची’ दमछाक
थेट जनतेतून सरपंच निवड असल्याने इच्छुकांची संख्या वाढली

लोकगर्जनान्यूज
बीड : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. थेट सरपंच निवड असल्याने अनेक इच्छुक आहेत. यामुळे गावागावात बंडाळी होणार हे निश्चित आहे तसेच ही बंडाळी मोडून काढण्यासाठी आणि चांगले उमेदवार शो़धण्यासाठी पुढाऱ्यांची दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळे पुर्ण जिल्ह्यातील विचार केला तर नगण्य असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मटण,दारु, पैसे ऐवजी मतदारही आता गावच्या विकासाला व चांगल्या उमेदवारांना प्राधान्य देत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया काल सोमवार ( दि. २८ ) पासून सुरू झाली. यासाठी शेवटचा दिवस २ डिसेंबर आहे. परंतु अद्यापही पॅनल ठरले नाहीत. चांगल्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. गावातील प्रस्थापित पुढारी पुर्वी स्वतःच्या शेतातील सालगडी, नोकर, उठ म्हटले तर उठणार अन् बस म्हटले की, बसणार असे उमेदवार उभे करत असे. परंतु काळ बदलत गेला. चांगल्या प्रकारे विकास कामे केली गेल्याने गाव देशपातळीवर चमकले आहेत. सर्वात श्रीमंत गाव म्हणून हिवरे बाजारला ओळखले जाते. आधुनिक गाव म्हणून पाटोदा ( औरंगाबाद ) ओळख निर्माण केली. यासह अनेक गावं त्यांच्या कुवतीनुसार व साधनातून सक्षम झाली आहेत. या गावांच्या बदललेल्या चेहऱ्याचा बातम्या वाचण्यात,पहाण्यात येत असल्याने प्रत्येक गावातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातलं गाव आहे. यासाठी हवंसे गवसे नाही तर चांगले व गावाच्या विकासाची तळमळ असणारा सरपंच, सदस्य असावेत अशी रास्त अपेक्षा आहे. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने ही मतदारांसाठी चांगला सरपंच निवडणे सोपं झालं आहे. पण या निर्णयामुळे पुढाऱ्यांची गोची झाली. हुशार,अभ्यासु, गावाच्या विकासाची तळमळ असणारा उमेदवार नको असतो पण तो अपक्ष उभा राहिला तर वर्चस्वाला धक्का बसण्याची भीती असल्याने झोप उडाली आहे. आपल्या गटाचा चांगला व गावाचा विश्वासू चेहरा आपल्याकडे असावं तसेच जनतेतून सरपंच निवड असल्याने पद एक आणि इच्छुक जास्त असल्याने बंडाळी होत आहे. ती मोडून काढण्यासाठी व पॅनेलमधील सदस्य पदाचे उमेदवार सापडत नसल्याने ते शोधण्यासाठी पुढाऱ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र दिसत आहे.