प्रेरणादायी! धारुर तालुक्यातील ऊसतोड मजूर बनला फौजदार
प्रा. ईश्वर मुंडे यांनी सत्कार करुन दिल्या शुभेच्छा

लोकगर्जना न्यूज
कोणतीही खाजगी शिकवणी न लावता जिद्द व चिकाटीने अभ्यास करून ऊसतोड म्हणून मजूरी करणाऱ्या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षेत यश संपादन करुन अशोक मैंद ( मैंद वाडी ता. धारुर ) हा तरुण फौजदार ( PSI ) झाला. हे यश म्हणजे ग्रामीण भागातील सामान्य घरातील तरुणांसाठी प्रेरणादायी असे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
अशोक मधुकर मैंद रा. मैंदवाडी ( ता. धारुर ) या छोट्याशा वाडीतील ऊसतोड मजूर कुटुंबातील तरुणाने आई-वडीलां सोबत ऊस तोडणी करत इयत्ता १० पर्यंतचे शिक्षण केज येथील वसंत महाविद्यालयात पुर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण रामराव पाटील येथे करुन नंतर पदवीचे शिक्षण वसंत महाविद्यालयात आत्ताचे बाबुरावजी आडसकर महाविद्यालय येथे पुर्ण केले. घराची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने याची जाणीव असल्याने अशोक यांनी ऊस तोडणी करत व खाजगी शिकवणी न लावता जिद्द व चिकाटीने अभ्यास करून ( सेल्फस्टडी ) करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सर केली. फौजदार ( PSI ) होऊन स्वतः चे स्वप्न साकार करुन आपल्या मातीची मान उंचावली आहे. अशोक मैंद यांचे ट्रेनिंग पुर्ण झाले असून सध्या मुंबई कमिश्नर कार्यालयात नियुक्ती देण्यात आली. येथून नंतर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात येईल. एका ऊसतोड मजूर असलेल्या तरुणाने स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. ही परिस्थितीचा बाऊ करुन प्रयत्न न करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी अशी घटना आहे. अशोक मैंद हे काही दिवसांसाठी सुट्टीवर आले असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
* तरुणांनी आदर्श घ्यावा – प्रा. ईश्वर मुंडे
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे विभागीय अध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे यांनी फौजदार झाल्याबद्दल अशोक मैंद यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. स्वतः अभ्यास करून यश संपादन केले ही ग्रामीण तरुणांसाठी प्रेरणादायी बाब असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी भगवान पाटोळे,रामदास पाटोळे,मोहन चोले,रणजीत राठोड,शहाजी मैंद,केशव वाघमारे,मधुकर वाघमारे,कामा काळे,गौतम गायकवाड,महारुद्र मैंद,उत्तम अडागळे,बन्सीधर वैरागे,विनोद वैरागे,बंडू पाटोळे आदींची उपस्थीती होती.