प्रशासनाचे दुर्लक्ष! केज तालुक्यातील आंदोलकाची प्रकृती खालावली

केज : तालुक्यातील टाकळी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी एक तरुण बेमुदत आंदोलन करीत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने चार दिवसांपासून आंदोलन सुरू असून आंदोलकाची तब्येत खालावली असल्याने आज दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, राज्य रस्ता क्र. ५६ ते टाकळी, चांगरवस्ती ते रा.र. क्र. ६४ असा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला आहे. परंतु यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महादेव घुले हा तरुण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी म्हणून मागील तीन वर्षांपासून संघर्ष व तक्रारी करत आहे. परंतु प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. याच प्रश्नी महादेव घुले यांनी चार दिवसांपासून टाकळी येथे बेमुदत आंदोलन सुरू केले. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलन सुरू आहे. चार दिवस होत असल्याने आंदोलकाची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रशासनाने महादेव घुले यांना उपचारासाठी केज येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.