प्रतीक्षा संपली पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर
बीड : अतिवृष्टीमुळे यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे २०२१ खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा होती. ती संपली असून, बुधवार ( दि. १५ ) कालपासून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु रक्कम कमी येत असल्याचे शेतकऱ्यांमधून सांगितले जात आहे. तसेच किती टक्याने ही विमा रक्कम जमा होत आहे याचा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बीड जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा घेतलेल्या अग्रीकल्चरल इन्शुअरन्स कम्पनी ऑफ इंडिया चे व्यवस्थापक एस. व्ही. शेट्टी यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यात सॅम्पल सर्व्हेच्या आधारे बीड जिल्ह्यात ३६० कोटींचा क्लेम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यामुळे पीक विमा मिळणार हे निश्चित होते. परंतु खात्यावर जमा होणार कधी याची शेतकऱ्यांना उत्सुकता होती. ३६० कोटीचा पीक विमा मंजूर झाल्याची बातमी ऐकल्यापासून शेतकरी मोबाईलवर आलेला प्रत्येक मेसेज पहात होता. परंतु ज्याची प्रतीक्षा होती ते पीक विमा रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज बुधवार ( दि. १५ ) पासून येण्यास सुरुवात झाली. बुधवार, गुरुवारी असे दोन दिवसात केज तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले आहेत. आडस येथील प्रशांत चव्हाण, शिवरुद्र आकुसकर, सत्यप्रेम ढोले, विकास काशिद, अनिल विश्वनाथ आकुसकर यांनी पीक विमा खात्यावर जमा झाल्याचे सांगितले आहे. तर, अद्याप ही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम आलेली नाही. परंतु टप्याटप्याने येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. क्षेत्र तेवढेच पण रक्कम कमी जास्त आल्याने पीक विमा टक्केवारी ठरवून आहे की, मनात येईल तसा आहे. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.