पोल तुटला पिंपळगव्हाणचे ७ रोहित्र तीन दिवसांपासून बंद
कनिष्ठ अभियंता म्हणतात माणस पाठवतोय तर शेतकरी म्हणतात वर्गणी करुन दुरुस्ती करत आहोत
केज : तालुक्यातील पिंपळगव्हाण येथे ऊसाच्या ट्रकने धडक दिल्याने ११ के.व्ही. विद्युत वाहिनीचा पोल व तारा तुटल्या आहेत. त्यामुळे या भागातील ७ विद्युत रोहित्र तीन दिवसांपासून बंद आहेत. वीजपुरवठा सुरू नसल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने वर्गणी करुन शेतकरी वीज वाहिनी दुरुस्त करून घेत आहेत. मात्र वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणारी महावितरण कंपनी झोपेत दिसून येत आहे.
शुक्रवारी ( दि. ३१ ) डिसेंबर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ११ के. व्ही विद्युत वाहिनीला धक्का लागून पोल मोडला आहे. यामुळे तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत आहे. लाईनमन, कनिष्ठ अभियंता यांना विनंती केली. परंतु ते दुरूस्ती करत नसून, यासाठी खर्च येईल असे लाईनमन म्हणत असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही दुरुस्ती होत नसल्याने पाण्या विना पिके कोमेजून जात आहेत. पंधरा दिवसांपूर्वी शेती पंपांचे वीजबिल भरले असून. आताही शेतकऱ्यांच्या माती खर्च मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी दुरुस्ती खर्च आम्ही का करावं? असा प्रश्न विचारत आहेत.
आज वीजपुरवठा सुरळीत होईल
ऊसाच्या ट्रकने धका दिल्याने एक पोल आणि तारा तुटल्या आहेत. परंतु आज त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होईल.
घंटे कनिष्ठ अभियंता मस्साजोग
आम्ही वर्गणी करुन दुरुस्ती करत आहोत
आम्ही अनेक वेळा महावितरण कनिष्ठ अभियंता कार्यालय, मस्साजोग यांना अनेक वेळा मागणी केली. ते दुरुस्ती करण्यासाठी चालढकल करीत आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी वर्गणी करुन गुत्तेदार च्या माध्यमातून काम सुरू केले आहे.
अशोक गायकवाड ( शेतकरी, पिंपळगव्हाण)