पोलीस असल्याचे सांगून वृध्द शेतकऱ्याचा अडीच लाखांचा ऐवज केला लंपास: केज येथील घटना
लोकगर्जना न्यूज
केज : येथील वृध्द शेतकरी रविवारी सकाळी स्कुटीवर कळंब रस्त्याने शेतात जाताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचे सांगितले. लुटीचे प्रकार घडत असल्याने अंगठ्या व लॉकेट काढून ठेवण्यास सांगून लक्ष विचलित केले. तब्बल २ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार केली.
सध्या अनेक ठग लोकांना लुटण्यासाठी टपून बसलेले आहेत. कधी कोणत्या मार्गाने फसवून आर्थिक लूट करतील याचा नेम नाही. यापुर्वीही केजमध्ये ओळख दाखवत व दागिने उजळून देतो म्हणून फसवणूकीचे प्रकार घडलेले आहेत. आता पोलीस बनून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, वृध्द शेतकरी महादेव शाहू चौरे ( वय ६५ वर्ष ) रा. वकिलवाडी केज हे रविवारी ( दि. ४ ) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कळंब रस्त्याने स्कुटीवरुन स्वतः च्या शेतात चालले होते. यावेळी पाठीमागून हेल्मेट घातलेली दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले. महादेव चौरे यांना थांबविले. त्या दोघांनी आम्ही पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखवलं व मागे एका व्यक्तीला लुटल्याची आठवण करून देत नावही सांगितले. तुम्ही इतक्या अंगठ्या व लॉकेट घालून कुठं चाललात हे काढून गाडीच्या डिकीत ठेवा म्हणत सोन्याच्या तीन अंगठ्या, गळ्यातील लॉकेट असा एकूण २ लाख ४० हजारांचा ऐवज नजर चुकवून लंपास केला. घराकडे परत जाताना चौरे यांना संशय आल्याने त्यानी डिकी उघडून पाहिली असता आतमध्ये फक्त हात रुमाल दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महादेव चौरे यांनी केज पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून केज पोलीसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करत आहेत.