पोलीसाच्या घरी धाडसी चोरी; महिला, मुलांना मारहाण करत चोरट्यांनी केली दहशत निर्माण
बीड : पाटोदा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत, शस्त्राचे धाक दाखवून सेवानिवृत्त फौजदार व पोलिस शिपाई अशा दोन ठिकाणी चोरी करत रोख रक्कम व सोन्याची दागिने लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यावेळी चोरट्यांनी लहान मले, महिलांना ही मारहाण केली. मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड येथे उपचार सुरू आहेत. चोरट्यांनी पोलीसांच्या घरीच चोरी करुन एक प्रकारे पोलीसांना आव्हान दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पाटोदा शहरातील जुने पोलीस ठाणे परिसरातील संगमेश्वर मंदिरा शेजारी व मांजरसुंबा रस्त्यावरील भाकरे वस्तीवर चोरट्यांनी रात्री २ च्या धुमाकूळ घातला. संगमेश्वर मंदिर शेजारी अंमळनेर ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शहाजी नाईकनवरे यांचे बंधू तुकाराम नाईकनवरे यांच्या घराच्या दरवाज्याचा जॅकच्या साहयाने लॉक तोडून आत घुसले व घरातील दोन तोळे सोने, चार तोळे बांगड्या असे ६ तोळे सोने आणि तुरीचे ७० कट्ट्याची रोख रकमेवर डल्ला मारला. यावेळी तुकाराम नाईकनवरे यांचा मुलगा गणेश तुकाराम नाईकनवरे यांनी चोरट्यांचा प्रतिकार केल्याने त्यांना प्रचंड प्रमाणात मारहाण करण्यात आली. मारु नका म्हणून विनवणी करणाऱ्या गणेश च्या आई आणि लहान मुलाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी आहेत. तिघांनाही उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . यानंतर चोरट्यांनी मांजरसुंबा रस्त्याकडे मोर्चा वळवला सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार सोमाजी धर्माजी मांजरे यांच्या घरात घुसून लहान मुलीला तलवारीचा धाक दाखवून दोन तोळे सोने व रोख पंधरा हजार घेऊन पसार झाले. सकाळी चोरीची घटना समजताच पाटोदा पोलीसांनी धाव घेतली.