कृषी

पुसदमध्ये गोरसेनेचा महाआक्रोश, मृतकाच्या कुटुंबाला न्याय द्यावा म्हणून एसडीओ कार्यालयावर धडकला मोर्चा

 

यवतमाळ:- महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील श्याम राठोड या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी बंजारा समाजबांधवांचा महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविले. या मोर्चासाठी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळी (दौ.) येथे दि. ३ डिसेंबर रोजी दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून काही युवकांनी श्याम शेषराव राठोड याचा खून केला होता. यानंतर काळी येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तेथे ठिय्या मांडून विविध उपाययोजना केल्या. त्यानंतरही शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे चौक, यशवंत रंगमंदिर मैदानमार्गे मोर्चा दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे त्यांना अभिवादन करण्यात आले. नंतर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, प्रवक्ते प्रफुल्ल जाधव यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या मोर्चातील गर्दी बघून उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांनी वसंतराव नाईक चौकात येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी एका महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला. दुपारी १.४०च्या सुमारास मोर्चा विसर्जित झाला.

आमदारांना पाठवले आल्या पावली परत
दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी आमदार इंद्रनील नाईक मोर्चात सहभागी होऊन सभास्थळी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांना आल्या पावली परत पाठवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »