पुन्हा सामान्यांच्या खिशाला कात्री! घरगुती वापराचे सिलेंडर ५० रु. वाढले

लोकगर्जना न्यूज
अधिच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना पुन्हा महागाईची झळ बसणार आहे. केंद्राने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरची दरवाढ केली असून प्रति सिलिंडर तब्बल ५० रुपयांनी महागले असल्याने खिशाला कात्री लागली आहे.
पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, सिमेंट,लोखंड, दाळी हे काहीचं स्वस्त नाही. कधी नव्हे इतकी महागाई झाल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली. यात पुन्हा केंद्राकडून मोठा झटका देण्यात आला. घरगुती वापराचा १४.२ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल ५० रु. वाढवून आता ९९९.५० म्हणजे तब्बल हजार रुपयांना केला. यात पुन्हा सबसिडी ही येत नाही. परंतु जेव्हा ४५० रु. हाच सिलिंडर येत होता तसेच १०० ते १५० सबसिडी खात्यावर जमा होत होती. तरीही तो महाग आहे म्हणून आंदोलन करणारे आज सत्तेवर आहेत. तेव्हा त्यांना हजारांचे सिलिंडर स्वस्त वाटत असल्याने केंद्रातील सत्ताधारी नेमका कोणता चष्मा वापरत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही दरवाढ दोन महिन्यांत दोन वेळा झाली आहे. यापुर्वी मार्च महिन्यात ५० रु. वाढ झाली होती त्यानंतर आता मे मध्ये ५० असे दोन महिन्यांत १०० वाढ झाली आहे. गॅस असो की, इंधन तेल व खाद्यतेल या दरवाढीचे खापर रशिया व युक्रेन युद्धावर फोडलं जातं आहे. तसेच व्यवसायिक गॅस सिलिंडरचे ही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात दर वाढ झालेली आहे. त्याचे दर २२५३ रु. झालेले आहेत. ९९९.५० घरगुती व व्यवसायिक २२५३ हे दिल्लीचे दर आहेत. यात आता विविध शहरांतील खर्च जोडता काही ठिकाणी यात काहीशी वाढ, घट दिसू शकते. या प्रश्नी विरोध ही गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काहीतर जातीपातीचा भोंगा वाजवत असून सर्वसामान्यांच्या घर जाणाऱ्या महागाईच्या वणव्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत.