पुन्हा भीषण अपघात; केज तालुक्यातील सहा जण जागीच ठार
लोकगर्जना न्यूज
बीड : मा.आ. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत असताना पुन्हा भीषण अपघाताची बातमी धडकली आहे. या अपघातात केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने बीड जिल्हा सुन्न झाला आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे येथून गावाकडे लग्नासाठी येत असलेल्या जिवाचीवाडी येथील कुटे कुटुंबावर काळाने झडप घातली. पाटोदा – मांजरसुंबा रस्त्यावर बामदे वस्ती ( ता. पाटोदा ) जवळ पुणे येथून जिवाचीवाडी ( ता. केज ) कडे येत असलेली स्विफ्ट डिझायर क्रमांक एम. एच. १२ के एन ९७६१ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. २६ बी ई ५९४५ याची धडक होऊन घडलेल्या अपघाताची घटना आज सकाळी घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. मयतामध्ये बालकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. अपघात इतका भीषण होता की, कार पुर्णपणे टेम्पो खाली अडकली होती. कारचा चेंदामेंदा झाला. कार काढण्यासाठी क्रेनचा वापर केला. घटनास्थळी पाटोदा पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.