पीक विम्याची रक्कम आजपासून खात्यावर!
बीड : अतिवृष्टीमुळे यावर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे २०२१ खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची प्रतिक्षा होती. याबाबतीत विमा कंपनीने आनंदाची माहिती दिली असून नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यासाठी ३६० कोटी विमा मंजूर झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून ही रक्कम पडणार असल्याचे जिल्ह्यातील वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित केल्या आहेत. शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
बीड जिल्ह्यासाठी खरीप पीक विमा घेतलेल्या अग्रीकल्चरल इन्शुअरन्स कम्पनी ऑफ इंडिया चे व्यवस्थापक एस. व्ही. शेट्टी यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून त्यात सॅम्पल सर्व्हेच्या आधारे बीड जिल्ह्यात ३६० कोटींचा क्लेम निश्चित करण्यात आल्याचे म्हटले आहे. विमा कंपनीने मंडळ आणि पीक निहाय नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठविला असून या ३६० कोटीच्या क्लेमला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यावर त्याचे वाटप सुरु करता येईल असे म्हटले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कंपनीने ५० ते ६० % नुकसानीच्या आधारे क्लेम तयार केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ५ लाख ५९ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याचे संकेत आहेत. २०२१ चा विमा मिळाला परंतु २०२० च्या पीक विम्याची अद्याप शेतकऱ्यांना प्रतिक्षाच आहे.