पिकअपने चिरडले दोन महिला ठार;पाली जवळ ट्रॉली पलटी
केज-अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव जवळील घटना
लोकगर्जनान्यूज
केज : अंबाजोगाई येथून वास्तूसाठी पुणे येथे जात असलेल्या दोघींवर काळाने झडप घातली असून, रस्ता ओलांडताना भरधाव पिकअपने चिरडल्याने दोघीही ठार झाल्याची घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावर चंदन सावरगाव जवळ एका हॉटेल समोर रविवारी ( दि.२३ ) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वंदना बाळु भंडारे ( वय ४३ वर्ष)रा.मुडेगाव ( ता.अंबाजोगाई), कमल केशव होळकर ( वय ३१ वर्ष) रा.जवळगाव (ता.अंबाजोगाई) असे दोन्ही मयतांची नावे आहेत. त्या आपल्या कुटुंबासोबत पुणे येथे भावाच्या घराच्या वास्तू शांतीसाठी जात होत्या, दरम्यान त्यांचे वाहन अंबाजोगाई-केज रस्त्यावरील चंदन सावरगाव-कुंबेफळ च्या मध्यभागी असलेल्या एका हॉटेल जवळ लघुशंकेसाठी थांबले. सोबत काही पुरुष असल्याने या दोन महिला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्या होत्या. तेथून परत वाहनाकडे येताना भरधाव वेगातील पिकअपने दोघांनाही चिरडून पळ काढला. ही धडक इतकी जोरात होती की, दोन्ही महिलांचे हात,पाय सह आदी हाडांचे अक्षरशः तुकडे झाले होते. तर डोक्यालाही गंभीर इजा होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघींनाही नातेवाईकांनी उपचारासाठी तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दवाखान्यात नेताच डॉ. समाधान घुगे यांनी तपासणी करुन दोघींनाही मयत झाल्याचे घोषित केले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.सय्यद अमजद,पो.कॉ.आतार हे घटनास्थळी दाखल झाले होते.
पालीजवळ चौक अन् रिक्षाला धडकून ट्रॉली पलटी; सुदैवाने जिवितहानी टळली
बीड : मांजरसुंभा येथून बीडकडे येत असलेले ट्रॅक्टर चौकाला आणि रिक्षाला धडकून ट्रॉली पलटी झाल्याची घटना आज सोमवार (दि.२४)सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाली जवळ घडली आहे. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी टळली.
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा येथून बीडकडे एक ट्रॅक्टर येत होते. दरम्यान बिंदुसरा प्रकल्पाजवळ आले असता तेथील चौकात एक वाहन अचानक ट्रॅक्टर समोर आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चौकाला धडकून परत एका अप्पे रिक्षावर धडकून ट्रॅली तुटून पलटी झाली. असा विचित्र अपघात घडला आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.