पाणी टाकीचे लटकत असलेल्या कठड्यामुळे धोका; ग्रामपंचायत झोपेत
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील जुन्या पाणी टाकीचे कठडे तूटून लटकले आहे. या टाकीच्या आजुबाजुला घरे असून हा कठडा कोसळला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. परंतु ग्रामपंचायत झोपेत दिसत असून काही अनुचित प्रकार घडल्यानंतर जाग येणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावर अंबाजोगाई रस्त्यावर जुनी पाण्याची टाकी आहे. येथेच पोलीस दुरक्षेत्र ( चौकी ) असून, या पाण्याच्या टाकीच्या आजुबाजुला वस्ती आहे. त्यामुळे येथे नेहमीच लहान थोरांची वर्दळ असते. या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीचे कठडे तुटले असून ते काही गजांच्या आधारावर लटकले आहे. जोरात हवा आली तर हा लटकलेला कठडा तुटून पडण्याची शक्यता आहे. योगायोगाने हा कठडा एखाद्या व्यक्ती अथवा मुलाच्या अंगावर पडला तर मोठा अनर्थ घडू शकतो. यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने याकडे लक्ष देऊन हा लटकलेला कठडा काढून घ्यावं अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
प्रशासकांना आडसची ॲलर्जी!
जवळपास पाच महिने होत आले असून आडस ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासक नियुक्त केले. परंतु हे प्रशासक महाशय केवळ १ मे ला ध्वजारोहण साठी आले. या व्यतिरिक्त त्यांनी आडसचे तोंड देखील पाहिलं नाही. प्रशासकच नाही तर ग्रामविकास अधिकारी कधी येतात अन् कधी जातात हे त्यांनाच माहीत. त्यामुळे तक्रार तरी कोणाकडे करावी अशी अवस्था ग्रामपंचायतची झाली आहे.