पाडळसिंगी-लोखंडी सावरगाव राज्य रस्ता २३२ डांबरी करण्यासाठी आंदोलन; या थिनगीचे वणव्यात रुपांतर व्हावं!
लोकगर्जनान्यूज
बीड : जवळपास दोन दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या पाडळसिंगी-लोखंडी सावरगाव राज्य रस्ता क्रमांक २३२ या महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावं म्हणून गुरुवारी ( दि. १० ) पाडळसिंगी येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ही रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाची थिनगी पडली असून, या मार्गावरील प्रत्येक गावात आंदोलनाचा वणवा पेटणं आवश्यक असून तेव्हाच हा प्रश्न सुटणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
औरंगाबाद, जालना, लातूर, अंबाजोगाई या शहरांना जवळ करणारा हा लोखंडी सावरगाव, आडस, धारुर, चिंचवण, वडवणी, ताडसोन्ना, पिंपळनेर, कुक्कडगाव, पाचेगाव, पाडळसिंगी असा राज्यमार्ग आहे. तसेच धारुर, वडवणी, माजलगाव या तालुक्यातील गंभीर रुग्णांना अंबाजोगाई, लातूर जाण्यासाठी जवळचा हा एकमेव मार्ग आहे. सर्वांच्या सोयीचा असलेला हा रस्ता मात्र राजकारण्यांच्या इच्छा शक्ती अभावी मागील दोन दशकांपासून दुर्लक्षित आहे. अनेक योजनांमध्ये हा रस्ता घेण्यात आला परंतु काम काही झाले नाही. रोडकरी म्हणून संबोधले जाणारे गडकरी यांच्या खात्याने या रस्त्याची राष्ट्रीय महामार्गाची तत्वतः मान्यता रद्द केली. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आघाडी शासनाच्या काळात माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी लक्ष घालून पाठपुरावा करत टेंडर पर्यंत नेले पण सत्ता बदल झाल्याने पुन्हा प्रक्रिया थंड पडली आहे. पुन्हा हा रस्ता रखडणार असे चिन्ह दिसत आहे. यामुळे तातडीने या राज्य मार्गाचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात यावं म्हणून पाचेगाव उपसरपंच सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाचेगाव, गुंदा वडगाव, कुक्कडगाव, दगडगाव, इरगाव, आहेर वाहेगाव, पाडळसिंगी येथील ग्रामस्थांनी गुरुवारी ( दि. १० ) सकाळी पाडळसिंगी येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी विस्तार अधिकारी चव्हाण, मंडळ अधिकारी येवले यांनी आंदोलकांचे मागणीचे निवेदन स्वीकारले. या मागण्या आम्ही शासनाला कळवून, पाठपुरावा करु असे आश्वासन दिले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गेवराई पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पाडळसिंगी येथे रस्त्यासाठी आंदोलन सुरू झाल्यानं ही थिनगी आहे. रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी या ८५ कि.मी. च्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करुन याचा वणव्यात रुपांतर करणे आवश्यक आहे. तेव्हाच या रस्त्याकडे, शासन व प्रशासन लक्ष देईल आणि हा प्रश्न सुटेल असे मत जानकार व्यक्त करत आहेत.