कृषी

पाच पिढ्यांची मामाच्या गावात दिवाळी

 

पठाण मांडवा येथील बिडवे कुटुंबाच्या आगळ्यावेगळ्या सोहळ्याची चर्चा

अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील बिडवे कुटुंबाच्या आगळ्यावेगळ्या दिवाळीची तालुक्यात चर्चा सुरू आहे. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने बहीणी,त्यांची मुले-मुली, जावाई, नातु,पंतु, खापर पंतु अशा पाच पिढ्यांना दिवाळीचे निमंत्रण दिले. सर्वांनी उपस्थिती लावून मामाच्या गावात चार दिवस आनंदात दिवाळी साजरी केली. यास एक कौटुंबिक आनंद सोहळाच पार पडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

बदलत्या काळानुसार जीवन धकाधकीचे झाले असून माणूस घड्याळाच्या काट्यानुसार पळत आहे. त्यामुळे गाठीभेटी दुरापास्त होत आहे. इच्छा असतानाही भेटणं शक्य होत नसल्याने नाते संबंधातील दुरावा वाढत चालले असून  मामाच्या गावाची दिवाळीची मजा वेगळीच असते परंतु धकाधकीच्या जीवनात आता ती केवळ गोष्टी पुर्ती राहिली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे तर, भेटणं, बोलणं संपुष्टात आले की, काय? असं चित्र आहे. परंतु धावपळ असू किंवा कितीही मोठे संकट असो माणसाने ठरवलं तर काहीही अशक्य नाही. आवड असेल तर सवड मिळते याप्रमाणे अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील वैनगंगा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शाहू कारभारी बिडवे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई कारभारी बिडवे ( वय ९२ ) वर्ष यांनी सर्वांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आईची इच्छा पुर्ण करण्यासाठी शाहू बिडवे यांनी दिवाळीचं मुहूर्त साधत सर्व भावांनी त्यांच्या मुली,जावाई, बहीणी,मेहवणे, भाचे, त्यांच्या पत्नी,लेकर असे सर्वच लक्ष्मीबाई यांचे मुलं,मुली, नातु,पंतु, खापर पंतु यांना दिवाळीसाठी पठाण मांडवा येथे येण्याचे निमंत्रण दिले. मामा,भाऊ, आजोबा, मेव्हण्याच्या मान राखून पुणे, सोलापूर, बार्शी, लातूर, बिदर, अंबाजोगाई, आडस,घाटनांदुर, पठाण मांडवा, औरंगाबाद, चनई येथील सर्व नातेवाईकांनी पुर्ण कुटुंबासह हजेरी लावली. खापरपंजी ते नातु असा जवळपास १०० जणांचा गोतवाळा एक जागी आलं. नातेवाईक असतानाही यातील काहींनी तर एकमेकांना पाहिलं ही नव्हते. या माध्यमातून त्यांच्या ओळखी झाल्या. सुख दुःखाची देवान घेवाण झाली. पहिल्या दिवशी परिचय मेळावा झाला. यात सर्वांनी परिचय देत मोबाईल नंबर, व घरी येण्याचं एक दुसऱ्यांना निमंत्रण दिले. रात्री गाणे, डान्स, उखाणे, भेंड्या खेळणे यातून सर्व लहान,थोर वय विसरून आनंदात सहभागी झाले. एक दिवस शेतात वण भोजन, डोंगर दऱ्यात, नदीच्या वाहत्या पाण्यात फिरुन निसर्गाच्या सान्निध्यात राहून मोहमाया विसरून तो दिवस स्वतः च्या आनंदात घालवला. यावेळी अनेक स्पर्धा ही घेण्यात आल्या यातून शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या यात सर्वांनीच बालकं होऊन आनंद साजरा केला. भाऊबीजच्या दिवशी सर्वांनी सामुहिक रित्या ओवाळून बहीण भावाचा हा सोहळा साजरा केला. आलेल्या पाहुण्यांनी आज्जी, मामा,मामी यांचे फेटा बांधून व शाल, श्रीफळ देऊन औक्षण केले. तसेच अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी बहुतांश जणांना आपले अश्रु रोखत आले नाहीत. सध्याचा धकाधकीच्या जीवनात स्वतः आणि नातेवाईकांसाठी वेळ काढून भेटणं, बोलने आवश्यक असून असे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. चौथ्या दिवशी अंबाजोगाई येथील देवीचे व मुकुंदराज स्वामींचे दर्शन घेऊन समारोप केला. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने याची अंबाजोगाई तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. ही फक्त दिवाळी नाही तर पाच पिढ्यांचा आनंद सोहळाच होता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. यातून नक्की दुरावत चाललेल्या नात्यात प्रेमाचं पुल ठरतं हा कार्यक्रम नाते दृढ करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमाचे आयोजक लक्ष्मीबाई कारभारी बिडवे यांचे पुत्र शाहू कारभारी बिडवे, पंडित कारभारी बिडवे, महालिंग कारभारी बिडवे व या तिघांच्या पत्नी फुलाबाई शाहू बिडवे, सुनिता पंडित बिडवे आणि गौरी महालिंग बिडवे यांचे आभार मानून सर्व नातेवाईकांनी निरोप घेत आपल्या घराकडे परतले.
—————————————————–

महिलांना वेळ मिळावा म्हणून चार आचारी

सण, असो की, काही कार्यक्रम महिलांना केवळ कामचं असतं परंतु या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुर्ण वेळ मिळावा म्हणून स्वयंपाक, भांडी धुणे यासाठी रोजंदारीवर माणसे होती. यासाठी सलग चार दिवस चार आचारी नाष्ट्यांपासून ते जेवणा पर्यंत सर्व कामे करत होती. त्यामुळे सर्वच महिलांना पुर्णवेळ सहभागी होऊन याचा आनंद घेता आला.
———————————————
आज्जीवर नातवांनी केली फुलांची उधळण

काही मोजक्या नशिबवंतांना खापरपंतु ( नातवाचे नातु ) चे तोंड पाहण्याचा दुर्लभ योग येतो. हा योग लक्ष्मीबाई बिडवे यांना आला. याचा आनंद म्हणून त्यांच्यावर चांदीच्या फुलांची व गुलाब पुष्पाची नातवांनी उधळण केली. या प्रेमाणे त्या भारावून गेल्या याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. यातच खूप समाधान असल्याचे शिवरुद्र आकुसकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »