पांढऱ्या सोन्याला झळाळी; प्रतिक्विंटल ११ हजार रु.दर

लोकगर्जना न्यूज
पांढर सोनं म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसाला झाळाळी आली असून आजपर्यंत कधीच नाही, असा ११ हजार रुपये विक्रमी दर मिळत आहे. ही ऐतिहासिक दरवाढ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तसेच कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांची कापसाने आर्थिक घडी बसवली आहे. परंतु मागील काही वर्षांपासून कापसावर लाल्या, बोंड अळी सह आदि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कापसाचा उतारा घटला असून एक्करी १२ ते १५ क्विंटल कापूस निघत होता त्यात घट होऊन चक्क दोन ते चार क्विंटल वर आलं. यामुळे खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी कापसाची अवस्था झाली आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीकडे दुर्लक्ष केले असल्याने यंदा उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. याचा बाजारावर परिणाम दिसत असून विक्रीसाठी कापूस येत नसल्याने, आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कापसाच्या दरांची घोडदौड सुरू आहे. सी.सी.आय. मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ७७५ तर लांब धाग्याच्या कापसाला ६ हजार १०० रु. हमी भाव देतो. परंतु सध्या हमीभाव पेक्षाही ४ ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर जास्त मिळतो आहे. रविवारी ( दि. ३० ) अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी असा १०८०० ते ११००० रु. असा दर मिळाला आहे. तसेच आज सोमवारी ( दि. ३१) धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीने ही घोषित केलेले दर १० हजारांच्या घरात असून आज नर्मदा जिनिंग ॲन्ड प्रेसिंग धारुर येथे सर्वाधिक ९९५० असा दर आहे. या खालोखाल बालाजी जिनिंग फ. जवळा ( दिंद्रुड ) येथे ९९०६, नर्मदा कोटेक्स भोपा ९९००, लक्ष्मी व्यंकटेश भोपा ९८५६, विश्र्वतेज जिनिंग खोडस ९८०१ असे १० हजारांच्या घरात दर आहेत.तर,आडस येथे स्थानिक पातळीवर ९९०० रू. प्रतिक्विंटल कापूस खरेदी आज सुरू आहे. हे ऐतिहासिक दर आसले तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंद दिसत नाही. कारण की, फार कमी बोटांवर मोजता येतील इतक्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. त्यात अतिवृष्टी, बोंड अळीने उत्पादन घटले आहे. मात्र दरवाढ झाल्याने झालेला खर्च निघणार आहे. परंतु ११ हजारांपर्यंत गेलेले सोयाबीन दर पाहून सोयाबीन पीक घेतले त्याचे दर दररोज घसरत आहेत. आज तर लातूर येथील एडीएम ( टिनाचे ) ६०५० असा दर आहे. या खालोखाल इतर दर आहेत. त्यामुळे शेतकरी सोयाबीन दर वाढावेत म्हणून डोळे लावून बसले आहेत. परंतु सोयाबीन दरात घसरण सुरू आहे. यामागे कारण काय? हे ही कोणी स्पष्ट पणे सांगत नाही. शेतकऱ्यांची कापसाचे दर वाढल्याने हासू तर सोयाबीन घसरत असल्यामुळे आसू अशी अवस्था झाली आहे.