पवारसाहेब, मुस्लिमांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्व देण्याचे पुढे काय झाले?
बिलाल शेख यांचा पत्रकातून सवाल; मुस्लिम समाजाची मांडली भावना
बीड (प्रतिनिधी)
दि.११ : गत विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी संदीप क्षीरसागर यांना विजयी करा मी मुस्लिम समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देतो असे जाहीर आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाचे पुढे काय झाले? असा सवाल आता मुस्लिम समाजातून उपस्थित केला जात आहे. याच अनुषंगाने बीड येथील मुस्लिम समाजाचे नेते बिलाल शेख यांनी प्रसिद्धपत्रक काढले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, बीडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने २०१९ साली झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्ही संदीप क्षीरसागर यांना निवडून आणा, मी मुस्लिम समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व देतो असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यामुळे माजी आमदार सय्यद सलीम यांच्या रूपाने परिषदेत मुस्लिम समाजाला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु शरद पवार यांनी जाहीर सभेत दिलेला आश्वासन हवेत विरले. शरद पवारांचे एका शब्दावर विश्वास ठेवून मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदान संदीप क्षीरसागर यांना केले होते. मात्र समाजाला गृहीत धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रतिनिधित्व दिले नाही. शरद पवार यांना मुस्लिम समाजाचे केवळ मतदान लागते, परंतु त्या समाजातून नेते मोठे करायचे नाही असं त्यांचं धोरण आहे. या निवडणुकीत केवळ आष्टीतून मेहबूब शेख यांना संधी दिली. तो उमेदवार देखील मॅनेजर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. त्या जागेऐवजी माजी आमदार बाबाजींनी तुराणी यांना पात्री विधानसभा मतदारसंघातून संधी दिली असती तर नक्कीच ते विजयी झाले असते. अशाप्रकारे निवडून येण्याची शक्यता असणारा उमेदवार डावलून क्षमता नसलेल्या व्यक्तीला संधी द्यायची असे करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आहे. तीन तलाख कायद्याबद्दल शरद पवारांची भूमिका काय होती? पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रती पक्षाने कधीही भूमिका स्पष्ट केली नाही. एनसीआर प्रश्न, रामगिरी महाराजांची भूमिका, नितेश राणे यांचे वक्तव्य, अशावेळी देखील पक्ष चूप राहिला. तुम्ही कधीच मुस्लिम समाजाची बाजू घेतली नाही, स्वतःला फक्त सेक्युलर दाखवून मुस्लिम समाजाचे मतदान पाहिजे. त्यामुळे येत्या २० तारखेला नक्कीच मुस्लिम समाज तुमच्या उमेदवाराला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास मुस्लिम समाजाचे नेते बिलाल शेख यांनी व्यक्त केला आहे.