परंपरेनुसार विड्यात वाजतगाजत जावायाची गाढवावरून मिरवणूक
सोन्याची अंगठी अन् कपड्यांच्या अहेर देऊन मानकरी जावायाचा सन्मान
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील विडा येथे परंपरे नुसार वाजतगाजत,डिजेच्या तालावर गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्यात आली. धुळवड च्या निमित्ताने सोमवारी ( दि. २५ ) सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली मिरवणूक दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संपली. मंदिरावर मिरवणूक गेल्यानंतर सासऱ्याकडू जावयाला भरपेहराव व सोन्याची अंगठी देऊन सन्मान करण्यात आला.
विडा येथे थट्टा मस्करीत गाढवावर बसवून जावयाची १०० वर्षांपूर्वी मिरवणूक काढण्यात आली. ही घटनाच या गावाची परंपरा बनली आहे. निजाम काळा पासून जावयाला गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा विडा हे गाव जपत आहे. प्रत्येक वर्षी धुळवड ( धुलीवंदन ) दिनी ही मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक वर्षी नवीन जावायाला गाढव स्वारीचा मान असतो. यावर्षी एकनाथ पवार ( विडा ) यांचे जावई संतोष जाधव रा. शिंदी ( ता. केज ) हे होते. आणलेला एक जावाई ऐनवेळी पळून गेला. आता काय करावे? म्हणून मिरवणूकीच्या पुर्व संध्येला पुन्हा जावायाच्या शोधात दोन पथके निघाली. वकील असलेल्या जावायाकडे गेले असता ते मिळून आले नाही. तेथून परतताना शिंदी येथे संतोष जाधव भेटले त्यांना मेव्हण्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी ( दि. २५ ) सकाळी गाढवावर बसवून डीजेच्या तालावर वाजतगाजत ग्रामपंचायत कार्यालयापासून मिरवणूक सुरू झाली. पुर्ण गावातून मिरवणूक हनुमान मंदिरावर गेली. जावई संतोष जाधव यांना कपडे, सोन्याची अंगठीचा सासऱ्यांकडून आहेर देऊन सन्मान केला. यावेळी गावातील तरुणाई उत्साहात होती. यावेळी विडा व परिसरातील गावांसह जिल्हाभरातील नागरिक ही मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते.
पकडलेला जावाई ऐनवेळी पळून गेला
धुलीवंदन जवळ आले की, विडा येथील गावकऱ्यांना जावायाच्या गाढव स्वारीचे वेध लागतात. यावेळी विड्याचे सर्व जावाई भूमिगत असतात. त्यांना शोधून पकडून आणण्यासाठी विडा येथील तरुणांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात येतात. ते जावाई शोधून आणतात. यावेळी प्रथम अशोक भोसले हा जावाई पथकाने ताब्यात घेतला. गावात आणून तो निगराणीत ठेवला. नजर हटी दुर्घटना घटी म्हणतात त्याप्रमाणे सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना झोप लागली अन् या संधीचा फायदा घेऊन अशोक भोसले यांनी धुम ठोकली.
चिंचेच्या झाडावरुन जावाई घेतला ताब्यात
ताब्यात घेतलेला जावाई ऐनवेळी पळून गेल्याने एका दिवसात कोणाला आणावं हा प्रश्न पडला. पुन्हा दोन पथके जावायाच्या शोधात निघाली. प्रथम ॲड. एन.आर. शिंदे यांच्याके गेले ते मिळाले नाही. त्यामुळे शिंदी येथील संतोष भोसले यांच्या शोधत एक पथक गेले. ते शेतात चिंचेच्या झाडावर लपून बसले होते. त्यांना खाली उतरायला सांगून ताब्यात घेतले.