‘पन्नास खोके सरकार ओके’ आंदोलन करुन बीड जिल्ह्यातून आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी
उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील बोगस हिवताप प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. परंतु यातील दोषी अधिकाऱ्यांची आरोग्य मंत्री पाठराखण करत असल्याच्या व बदल्यांना स्थगितीच्या निषेधार्थ ‘पन्नास खोके सरकार ओके ‘ जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करुन आरोग्यमंत्र्यांच्या हकालपट्टी सह विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
बीड जिल्ह्यात बोगस हिवताप प्रमाणपत्र मिळवून त्यावर सरकारी नोकरी लाटणाऱ्या ६९ जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले परंतु चौकशीमध्ये प्रमाणपत्र देणारे जिल्हाहिवताप अधिकारी डॉ. के. एस. आंधळे, किटक संमाहरक जीवन सानप, वरिष्ठ लिपिक के.के. सातपुते दोषी आढळले आहेत. त्यांच्यावरील कारवाईला आरोग्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. या दोषींची पाठराखण करण्यात येत असल्याने आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, बोगस प्रमाणपत्र वाटप प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावेत. उपसंचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक संवर्गातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यान दुसऱ्याच दिवशी स्थगिती दिली. याची चौकशी करण्यात यावी यासह काही मागण्यांसाठी डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ( दि. २१ ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पन्नास खोके सरकार ओके’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शेख सादेक, शेख युनुस, शेख मोबीन, पठाण हमीदखां, पठाण जाकीर, अशोक येडे, रामनाथ खोड, भिमराव कुटे, प्रविण पवार आदि उपस्थित होते. यानंतर मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले.